(पक्या मोबाईलमध्ये डोके घालून धावतच येतो. भावड्या आणि पेंद्या आरामात बसलेले असतात.)
पक्या: आरं भावड्या, पेंद्या… इकडं या रं! धाराशिवमध्ये पार ‘खडाजंगी’ लागलीया!
भावड्या: (जांभई देत) लागली आसंल… आपल्याला काय त्याचं? आपलं सोयाबीन गेलं पाण्यात… अन त्येंच्या मारामाऱ्या… काय नवीन ‘इषय’ हाय आज?
पक्या: नवीन? आरं, पार जुनं-खुनं पाळंमुळं खणायचं काम चालू हाय. भाजपवाल्यांनी एक ‘बॅंक’ काढलीया…
पेंद्या: (उत्साहाने) बॅंक? सोसायटीवानी? कर्ज मिळंल का रं? पोरीच्या लग्नाला जरा हातभार लागंल…
पक्या: च्यायला! येडं हाय का काय रं तू? ती पैशाची बॅंक न्हाय, ती ‘ब्लंडर’ बॅंक हाय!
भावड्या: ‘बंडर’ बॅंक? आता हे काय नवीन उप्याद?
पक्या: ‘बंडर’ न्हाय रं, ‘ब्लंडर’.. म्हंजी चुका जमा करायची ब्यांक. कोण किती चुका करतंय, याचा हिशोब ठिवत्यात त्ये.
पेंद्या: (खिशात चाचपडत) च्या मारी… ! माझी परवाच दोन कोंबड्यांची पिल्लं हरवली, ती चूक त्येंच्या खात्यात जमा व्हईल का रं?
भावड्या: (कपाळावर हात मारत) आरं पेंद्या, तुझ्या कोंबड्यावानी न्हाय रं ते. राजकारणातल्या चुका. मंग ह्या ब्यांकनं काय केलं?
पक्या: त्येंनी ओमराजेंना डिवचलं, म्हनले, “आम्हाला कळालंय.” त्यावर शिवसेनेवाले भडकले की! त्येंचा सोमनाथ गुरव नावाचा गडी लय ‘ट्राट’ निघाला.
भावड्या: मंग? काय म्हनला त्यो?
पक्या: त्यो काय म्हनला? त्यानं पार ‘पंचनामा’ केला की! त्यो म्हनला, “गंजुट्या मालकाचे आदेश, अन गुलामांच्या पोस्ट!”
(पेंद्या आणि भावड्या एकमेकांकडे बघतात.)
पेंद्या: ‘गंजुट्या मालक’? म्हंजी… आपल्या पिरबाच्या नांगराला जसा गंज चढलाय तसला मालक का? त्याला ऑईल लावायला पायजे की!
भावड्या: (हसून) आरं येड्या! ‘गंजुट्या’ म्हंजी काय कामाचा न्हाई, जुना झालेला… आककल गंजलेली आसलेला. अन ‘गुलाम’ म्हंजी चमचे! समजलं?
पक्या: आरं, पुढचं तर ऐका की! त्यो गडी तिथंच थांबला न्हाय. त्यानं थेट धमकीच दिलीया… म्हनला, “तिन्ही पिढयांच्या कारनाम्याचे… उपलब्ध आहेत!”
पेंद्या: (घाबरून) देवा! आता काय खरं न्हाय. माझ्या आज्यानं एकदा पाटलाच्या शेतातली दोन आंबं चोरली व्हती, त्यो ‘कारनामा’ पन काढत्याल का रं त्ये? माझी तर पार ‘वाट’ लागंल की गावात!
भावड्या: आरं तुझा आजोबा काय खासदार व्हता का? त्ये राजकारण्यांचं काढत्याल. कुणी कुणाची जमीन दाबली, कुणी कुठं ‘भानगड’ केली… त्ये सगळं! म्हंजी, तू एक बोट दाखिवलं, तर आम्ही तुझी पूर्ण ‘खानदान’ उघडी करू, आसं झालंय हे.
पक्या: बगा! कशी जिरवली! आता काय बोलत्याल ती ‘बंडर’ ब्यांकवाले?
भावड्या: काय बोलणार? गंजलेला मालक आता गप बसणार. आपल्याला काय? आपली शेती सुकी पडलीया, आन त्येंचे मोबाईल एकमेकांच्या नावानं ‘ओले’ व्हत्यात. चल रं पेंद्या, चहा मारू…
पेंद्या: व्हय व्हय. पन भावड्या, एक इचारू का? ह्या ‘ब्लंडर’ ब्यांकेत चुकांचं खातं उघडायला काय लागतंय? आपनबी एक उघडू का? लय चुका व्हत्यात माझ्याकडून…
(पक्या आणि भावड्या डोक्याला हात लावून बसतात.)