धाराशिव: अहो आश्चर्यम्! राज्यात ज्यांची घट्ट मैत्री, तेच मित्र धाराशिवच्या मैदानात एकमेकांचे ‘गळे’ धरू लागले आहेत. निमित्त आहे जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं! मुंबईत नुकतंच आरक्षण जाहीर झालं की धाराशिव जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद ‘सर्वसाधारण महिले’साठी राखीव असणार. मग काय, विचारता सोय नाही! निवडणूक कधी होणार, सदस्य कोण असणार, याचा पत्ता नसतानाच महायुतीच्या तीन प्रमुख पक्षांनी आपापल्या ‘माउलीं’ना थेट सोशल मीडियावर अध्यक्षच बनवून टाकलंय.
‘गुलाल आमचाच’… पण आधी निवडणूक तर होऊ द्या!
एकीकडे भाजपचे आमदार राणा पाटील यांनी त्यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील (ज्या लोकसभेत नुकत्याच साडेतीन लाखांनी पराभूत झाल्या) यांना भावी अध्यक्ष म्हणून घोषित केलंय. दुसरीकडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार राहुल मोटे (जे विधानसभेत १४०० मतांनी पराभूत होताच शरद पवारांना सोडून अजितदादांसोबत आले) यांनी त्यांच्या पत्नी वैशालीताई मोटे यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरवलं आहे.
आता या स्पर्धेत शिवसेना शिंदे गट तरी कसा मागे राहील? आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि माजी सभापती धनंजय सावंत यांनी त्यांच्या पत्नी ज्योतीताई सावंत यांचं नाव पुढं केलं आहे. जणू काही अध्यक्षपदाची खुर्ची नाही, तर संगीताची खुर्चीचा खेळ सुरू आहे आणि प्रत्येक जण आपापल्या उमेदवाराला बसवण्यासाठी धडपडतोय.
सोशल मीडियावर तर जणू ‘गुलाला’चा पाऊसच पडतोय. “लागा तयारीला, गुलाल आपलाच,” अशा घोषणांनी वातावरण गरम झालं आहे. पण गंमत म्हणजे, जिल्हा परिषदेचे ५५ गट कुठले, त्यांचं आरक्षण काय, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवडणूक कधी होणार, हे अजून कोणालाच माहीत नाही.
महाविकास आघाडीची फक्त ‘मजा’!
या सगळ्या ‘महा’गोंधळात शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस मात्र शांत बसून गंमत पाहत आहेत. “आधी यांना आपापसात लढू द्या, मग बघू,” अशा अविर्भावात ते या ‘तू तू-मैं मैं’चा आनंद लुटत आहेत. राज्यात जरी हे तिन्ही पक्ष ‘महायुती’ म्हणून एकत्र असले तरी, धाराशिवमध्ये मात्र ‘हम किसीसे कम नही’ म्हणत एकमेकांसमोर दंड थोपटून उभे आहेत.
आता धाराशिवची जनताच विचारतेय, “अहो, आधी लगीन तर लावा, मग अक्षता टाका!” पण नेत्यांना कसली आलीय घाई, त्यांनी तर थेट ‘बारशा’चीच तयारी सुरू केली आहे.