स्थळ: गावातला पार, वडाच्या झाडाखाली ठेवलेला बाकडा.
(पक्या मोबाईलमध्ये काहीतरी बघत जोरजोरात हसत असतो.)
भावड्या: आरं पक्या, काय झालं? मोबाईलमध्ये बघून असा येड्यागत काय हसतोय? बायकोनं आज मारलं नाही वाटतं घरात?
पक्या: (हसून डोळ्यातून पाणी काढत) आरं भावड्या, काय सांगू तुला… आपला धाराशिवचा राजकीय आखाडा बघतोय. नुसता धुरळा उडालाय! आमदार राणा पाटलांचा चिरंजीव बघितला का? मल्हार पाटील… काय दंड थोपटत होता खासदार ओमराजेंच्या म्होरं! जसा काय तालमीतला पैलवानच!
पेंद्या: (तोंडातला तंबाखूचा तोबरा आवरत) व्हय व्हय! म्या बी बघितला तो ‘रील’. ती बी गाणं कुठलं? ‘ढोलकीला बांधून बदा बदा बडवीन’… इश्श! खासदाराच्या तोंडावर असं नाचायचं म्हंजी काय लहान गोष्ट हाय व्हय? छाती लागते त्याला छाती!
भावड्या: छाती नाय रं गड्या, त्याला मस्ती म्हन्त्यात! आरं, एकीकडं ‘शिस्तप्रिय’ मिरवणुकीचं बक्षीस लावायचं, अन् दुसरीकडं असा राडा घालायचा! हे काय पटतंय का? अन् वरनं आमदार सायेब काय म्हन्त्यात? “असे शिस्तप्रिय कार्यक्रम होतच राहणार!”… म्हणजे अजून बघावं लागणार हे असले तमाशे!
पक्या: तेच तर! अन् खासदारांनी बी आता संयम सोडलाय. थेट बोलले की, “जनता यांचा माज उतरवेल!”. आता खरं पेटलंय बघ… मामला ‘रील’वरनं थेट ‘रिअल’वर आलाय.
पेंद्या: (उत्साहाने) मंग… झाली का हाणामारी? कुणी कुणाला ढोसला? आपल्याकडं काय बातमी हाय का?
भावड्या: आरं पेंद्या, येड्या! आता हाणामारीचा जमाना गेला. आता ‘क्लिप’चा जमाना हाय. भाजपचा शहराध्यक्ष काय म्हणतोय बघ, “आमच्याकडे पण खासदारांची क्लिप हाय, टायमिंगला बाहेर काढू!”.
पेंद्या: (गोंधळून) क्लिप? आवं, ती केसात लावायची क्लिप का? खासदार बायांच्यासारखी क्लिप लावत्यात व्हय?
पक्या: (कपाळावर हात मारत) आरं देवा! पेंद्या, तुझं काय खरं नाय! क्लिप म्हंजी व्हिडिओ क्लिप रं… मोबाईलमध्ये काढलेली! काहीतरी भानगड असणार त्यात.
भावड्या: अन् शिवसेनेच्या लोकांनी तर त्यावर बी कडी केलीय. ते म्हन्त्यात, “अमित शिंदेंकडे त्यांच्याच एका माणसाची क्लिप दहा वरिस झालं हाय, ती आधी बाहेर काढा!”. आता सांगा, कुणाकडे कुणाची क्लिप हाय, हेच कळंना झालंय. नुसता क्लिपांचा बाजार भरलाय.
पक्या: खरंय! निवडणुकीच्या टायमाला मतांसाठी ही सगळी नाटकं चालल्यात. तुझ्याकडं आमची क्लिप, आमच्याकडं तुझी क्लिप… ह्यांच्या क्लिपांच्या नादात लोकांच्या प्रश्नांची पार ‘स्लिप’ झालीय!
पेंद्या: (डोळे मोठे करून) मंग आता काय व्हनार? कुणाची क्लिप आधी बाहेर येणार? मल्हार पाटलांच्या डान्सची का खासदारांच्या भानगडीची? मला तर लय टेन्शन आलंय राव! रातची झोप बी लागायची नाय आता.
भावड्या: (पेंद्याच्या पाठीत धपका मारत) आरं तुला कशाला टेन्शन? तू काय इलेक्शनला उभा हाय का? आपल्यासारख्या गरिबानं ह्यांच्या नादात लागायचं नसतं. ह्यांची क्लिप येवो नाहीतर पिक्चर येवो, आपल्या नशिबाचा ‘द एन्ड’ हाय तसाच राहणार. चल पक्या, चहा टाकू… ह्यांच्या राजकारणापेक्षा आपला चहाच लय गरम हाय!
पक्या: (मोबाईल खिशात टाकत) बरोबर बोलला भावड्या! चल रं पेंद्या… क्लिप बघायची हाय का चहा प्यायचा हाय?
पेंद्या: चहा बी पितो… अन् रात्री जागून कोणाची क्लिप फुटतीया का ते बी बघतो! काय बी म्हणा, धाराशिवच्या इलेक्शनमध्ये यंदा नुसता ‘धिंगाणा’ हाय… फुल टू मनोरंजन!
(तिघेही चहाच्या टपरीकडे जातात, पण राजकारणाचा ‘क्लिप’मय धुरळा त्यांच्या डोक्यात फिरतच राहतो.)