नळदुर्ग- गॅस टाकी भरून आणण्याच्या शुल्लक कारणावरून एका छत्तीस वर्षीय तरुणाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे घडली आहे. या मारहाणीत तरुणाच्या हाताच्या मनगटाला गंभीर दुखापत झाली असून, त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.
याप्रकरणी पीडित तरुणाच्या तक्रारीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात दोन महिलांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी भारत बालाजी बोराडे (वय ३६, रा. चिवरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना ४ सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास घडली. फिर्यादी आपल्या मुलासोबत गॅस टाकी भरून आणत असताना आरोपी बिभीषण महादेव बोराडे, सुलभा राजेंद्र क्ज्ञाब्ळे आणि छाया बिभीषण बोराडे (सर्व रा. चिवरी) यांनी त्यांना अडवून वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, हात पिरगाळून मनगटाजवळ गंभीर जखमी केले आणि घटनेची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर भारत बोराडे यांनी गुरुवारी, १८ सप्टेंबर रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११७(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. नळदुर्ग पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.