धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात दुचाकी चोरांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, वेगवेगळ्या ठिकाणांहून तीन मोटारसायकली चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. धाराशिव शहर, ढोकी आणि वाशी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चोरट्यांनी एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
या सर्व घटना गुरुवारी, दि. १८ सप्टेंबर रोजी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवण्यात आल्या.
शहरातून सीबी शाईन गायब
पहिल्या घटनेत, धाराशिव शहरातील तांबरी विभागात राहणारे अमोल नागनाथ गुंड (वय ४४) यांची ३५,००० रुपये किमतीची हिरो कंपनीची सीबी शाईन मोटरसायकल (क्र. एमएच २५ एई ०२४२) चोरीला गेली. दि. १७ सप्टेंबरच्या रात्री घरासमोर लावलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतातून स्प्लेंडर उचलली
दुसरी घटना ढोकी येथे घडली. दत्तात्रय चंदरराव देशमुख (वय ४२, रा. ढोकी) हे दि. १८ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांच्या शेत शिवारात गेले होते. यावेळी त्यांनी बाहेर लावलेली ६०,००० रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल (क्र. एमएच २५ डब्ल्यु १६६९) अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
धाब्यावरून तिसरी मोटरसायकल चोरीला
तिसऱ्या घटनेत, रमेश गंगाराम पवार (वय ४२, रा. परतूर) यांची ४०,००० रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल (क्र. एमएच २१ सीसी ७५२५) चोरीला गेली. दि. १२ सप्टेंबर रोजी रात्री त्यांनी ईट (ता. भूम) येथील युवराज धाब्याजवळ झोपडीच्या बाजूला मोटरसायकल लावली होती, जी सकाळी गायब असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी त्यांनी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या तिन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांनी अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.