धाराशिव: वाशी तालुक्यातील पिंपळगाव ( क) येथील वादग्रस्त तुळजाई लोकनाट्य कला केंद्राचा परवाना जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पुजार यांनी कायमस्वरूपी रद्द केल्यानंतर, जिल्ह्यातील पोलीस प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या धडक कारवाईनंतर, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री जिल्ह्यातील इतर पाच कला केंद्रांवर छापे टाकले. या तपासणीत अनेक ठिकाणी नियमांचा सर्रास भंग होत असल्याचे आणि धक्कादायक प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आले आहे.
या केंद्रांवर झाली कारवाई:
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री १२ ते १ च्या सुमारास ही कारवाई केली. यामध्ये आळणी (ता. धाराशिव) येथील साई आणि पिंजरा या कला केंद्रांवर, तर चोराखळी पाटी येथील गौरी, कालिका आणि महाकालिका या कला केंद्रांवर छापे टाकण्यात आले. यापूर्वी चोराखळी येथील महाकाली केंद्रात गोळीबाराची घटनाही घडली होती.
बंद खोलीत नृत्याचे धक्कादायक प्रकार
पोलिसांना तपासणीत एक धक्कादायक प्रकार आढळून आला. नियमांनुसार कलाकारांसाठी स्टेजची व्यवस्था करणे बंधनकारक असताना, या केंद्रांमध्ये बंद खोलीत नृत्य सुरू होते. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या प्रकारांमुळे अनेक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ (नवीन भारतीय न्याय संहिता कलम २२३) नुसार संबंधित कला केंद्र चालकांवर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात संस्कृतीच्या नावाखाली गैरप्रकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.