धाराशिव: जिल्ह्यात अवैध आणि नियमबाह्य कृत्यांचे अड्डे बनलेल्या कलाकेंद्रांवर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठी खळबळ उडवून दिली आहे. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी, दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी जिल्ह्यातील अनेक कलाकेंद्रांवर छापे टाकले. या कारवाईत परवान्यातील अटी व शर्तींचा भंग केल्याप्रकरणी ५ कलाकेंद्र चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाराशिव आणि कळंब तालुक्यातील विविध कलाकेंद्रांची झाडाझडती घेतली असता, अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले. कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या परवान्यातील नियमांना धाब्यावर बसवून ही कलाकेंद्र चालवली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
याप्रकरणी पोलिसांनी आळणी फाट्यावरील पिंजरा लावणी सांस्कृतिक लोकनाट्य कलाकेंद्राचे वैभव धनंजय माळी (रा. आळणी), साई लोकनाट्य सांस्कृतिक कलाकेंद्राचे नितीन विनायक चव्हाण (रा. आळणी), चोराखळी पाटीवरील गौरी लोकनाट्य कलाकेंद्राचे सुदर्शन श्रीकृष्ण शेळके (रा. येडशी) आणि महाकालीका लोकनाट्य कलाकेंद्राचे राजेंद्र माळी (रा. चोराखळी) व कालीका कलाकेंद्राच्या निर्मला मोहनराव जाधव (रा. परभणी, ह.मु. चोराखळी) यांच्याविरोधात येरमाळा आणि धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये एकूण ५ स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.
महाकाली कला केंद्र गुन्हेगारीचे केंद्र?
या कारवाईत कळंब तालुक्यातील चोराखळी येथील महाकाली कला केंद्र हे गुन्हेगारी कारवायांचे केंद्र बनल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच या कलाकेंद्रावर मोठी हाणामारी झाली होती. इतकेच नव्हे तर, याच कलाकेंद्रातील तीन महिला एका खून प्रकरणात आरोपी असल्याचे गंभीर वास्तव उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस अधीक्षक कार्यालयाने महाकाली कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करावा, असा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे.
या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध धंदे आणि कलाकेंद्रांच्या नावाखाली चालणाऱ्या गैरप्रकारांना मोठा हादरा बसला असून, पोलीस प्रशासनाच्या या ‘सफाई’ मोहिमेचे नागरिकांमधून स्वागत होत आहे.