परंडा: येथील मुजावर गल्लीतील चार जणांनी जमिनीच्या वादातून आपल्याच नात्यातील एका व्यक्तीला ‘तुला संपवल्याशिवाय हा मॅटर मिटणार नाही’ अशी धमकी देत लोखंडी रॉडने डोक्यावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी, २० सप्टेंबर रोजी दुपारी घडली असून, याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, महेदी रहीम हन्नुरे (वय ३८ वर्षे, रा. मोमीन गल्ली, परंडा) हे शनिवारी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास येथील करपुढे यांच्या दुकानाजवळून जात होते. यावेळी त्यांचे नातेवाईक असलेले आरोपी समीर हमजा हन्नुरे, शमी म. उर्फ मोहमद युनुस हन्नुरे, अहेमद हन्नुरे आणि खालेद हन्नुरे (सर्व रा. मुजावर गल्ली, परंडा) यांनी त्यांना अडवले.
“तेरेको खतम करने के सिवा ये मॅटर कुछ मिटने वाला नही, उसके वास्ते तेरेको खतम करके डालते तो सब मॅटर खतम हो जाते,” (तुला संपवल्याशिवाय हा वाद मिटणार नाही, त्यामुळे तुला संपवूनच टाकतो म्हणजे सर्व वाद संपून जातील) असे म्हणत आरोपींनी महेदी हन्नुरे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यातील एकाने लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर जबर प्रहार केला, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले.
या हल्ल्यानंतर जखमी महेदी हन्नुरे यांनी परंडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२), २९६, ३५१(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. कौटुंबिक वादातून झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे परंडा शहरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.