धाराशिव: जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोरी, घरफोडी आणि लूटमारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. घरात काम करणाऱ्या मोलकरणींनी मालकाच्या घरावर डल्ला मारल्याची घटना घडली असताना, दुसरीकडे मालकाने विश्वास टाकलेला चालकच मालवाहतूक गाडी घेऊन पसार झाला आहे. यासोबतच दुकान फोडून किराणा मालाची चोरी आणि बसमध्ये चढताना महिलेचे दागिने हिसकावण्याचे प्रकारही समोर आले आहेत. या विविध घटनांमध्ये एकूण ८.५ लाखांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला असून, संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात तसेच माहितीतल्या आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कळंब: दुकान फोडून ३७ हजारांचा किराणा माल लंपास
कळंब शहरातील छत्रपती संभाजी मार्केटमधील एका दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी ३७,३३२ रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. शुभम श्रीकांत संगवे (वय २६) यांच्या मालकीच्या शॉप नं. ३७ मध्ये ही घटना घडली. १८ सप्टेंबरच्या रात्री ते १९ सप्टेंबरच्या सकाळच्या दरम्यान चोरट्यांनी शटरचे लॉक तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातून पॅराशूट तेलाच्या १०५ बाटल्या, विविध कंपन्यांचे २४३ साबण, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाचे प्रत्येकी तीन डबे तसेच १०,००० रुपयांची रोकड असा माल चोरून नेला. याप्रकरणी शुभम संगवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
धाराशिव शहर: चालकानेच मालकाची साडेतीन लाखांची गाडी पळवली
मालकाने विश्वास ठेवून कामावर ठेवलेल्या चालकानेच साडेतीन लाख रुपये किमतीची तीन चाकी मालवाहतूक गाडी चोरून नेल्याची घटना शहरात घडली आहे. फयाज गफार बागवान (वय ४२) यांच्या मालकीचे बजाज मॅक्झिमा कार्बो वाहन (क्र. एमएच २५ एके २७२२) त्यांच्याकडे चालक म्हणून काम करणाऱ्या शिबु खान (वय ३६) याने चोरून नेले. याप्रकरणी फयाज बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
तुळजापूर: बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत महिलेचे गंठण खेचले
आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या तुळजापूर बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन एका अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून पळ काढला. उमाकांत वसंतराव जाधव (पाटील) (वय ६५, रा. भंडारी) हे त्यांच्या पत्नीसह ०९ सप्टेंबर रोजी दुपारी बसमध्ये चढत असताना ही घटना घडली. गर्दीत चोरट्याने त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे दागिने चोरले. या घटनेची तक्रार २० सप्टेंबर रोजी देण्यात आली असून, तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.