अंबी – परंडा-पाथरुड रस्त्यावर अंबी पोलिसांनी मोठी कारवाई करत कत्तलीच्या उद्देशाने जाणारा टेम्पो पकडला आहे. या टेम्पोमधून अत्यंत निर्दयपणे वाहतूक केल्या जाणाऱ्या ३ जर्सी गायी आणि ६ वासरांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, जनावरे आणि वाहन असा एकूण ३ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.४० च्या सुमारास अंबी पोलिसांना परंडा-पाथरुड रस्त्यावर एका पिकअप टेम्पोमधून (क्र. एमएच ४५ टी ३८९३) संशयास्पदरीत्या जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी टेम्पो थांबवून तपासणी केली असता, त्यात जनावरांना चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता अत्यंत निर्दयीपणे कोंबून कत्तलीसाठी नेले जात असल्याचे उघड झाले.
या कारवाईत पोलिसांनी मोहसिन सम्मद कुरेशी (वय ४२, रा. करमाळा, जि. सोलापूर) आणि शैकत तुरब शेख (रा. धाराशिव) या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात अंबी पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११(१)(अ), ११(१)(डी), ११(१)(ई) आणि प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५(अ)(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंबी पोलीस करत आहेत.