मुंबई: सध्याच्या काळात पक्षीय राजकारणातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. नांदगावकर यांनी ओमराजे यांना ‘सध्याच्या राजकारणातील कोहिनूर’ संबोधत, ते नव्या पिढीसाठी एक आदर्श असल्याचे म्हटले आहे. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असून, त्यांची ही पोस्ट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
बाळा नांदगावकर फेसबुक पोस्टमध्ये काय म्हणाले?
बाळा नांदगावकर यांनी आपल्या पोस्टची सुरुवातच “सध्याच्या राजकारणातील ‘कोहिनूर'” या वाक्याने केली आहे. ते म्हणतात, “नव्या युगातील राजकारण आणि राजकारणी याबद्दल सामान्य जनतेत खूप चांगल्या भावना नाहीत. या वातावरणात सर्वांनाच दिलासा देणारे नाव म्हणजे ओम राजे निंबाळकर. हा तरुण खासदार म्हणजे केवळ धाराशिव नव्हे, तर पूर्ण राज्याला आपलासा वाटणारा चेहरा आहे.”
एकनिष्ठता आणि कामाचे कौतुक
खासदार निंबाळकर यांच्या कामाचे कौतुक करताना नांदगावकर यांनी त्यांच्या एकनिष्ठतेचा विशेष उल्लेख केला. “अनेक अमिषे, दबाव आला तरी एकनिष्ठ राहून त्यांनी राजकारण केले. त्यामुळेच ते सुमारे ३.३० लाख मतांनी निवडून आले,” असे त्यांनी नमूद केले. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या काळात ओमराजे यांनी स्वतः पाण्यात उतरून केलेल्या बचावकार्याचा संदर्भ देत नांदगावकर म्हणाले, “सध्या पावसाने थैमान घातले असताना केवळ कोरड्या गप्पा न मारता, थेट ग्राउंडवर उतरून प्रसंगी लोकांसाठी जीव धोक्यात घालून तो अतिशय पुण्याचे काम करत आहे.”
तरुण पिढीसाठी आदर्श
बाळा नांदगावकर यांनी ओमराजे निंबाळकर यांना तरुण पिढीसाठी आदर्श मानले पाहिजे, असे मत व्यक्त केले. ते लिहितात, “नवीन पिढीने राजकारणाचा तिरस्कार करण्याआधी ओमराजे यांच्याकडे बघावे आणि गलिच्छ राजकारणातही ‘कोहिनूर’ हिरा कसा असतो, हे लक्षात येईल. बॉलिवूड सेलिब्रिटींना आयडॉल मानणाऱ्या लोकांनी ओमराजेंना आयडॉल मानून वाटचाल करायला हवी.”
मोठ्या भावाच्या नात्याने अभिमान आणि काळजीचा सल्ला
आपल्या पोस्टच्या शेवटी बाळा नांदगावकर यांनी एक भावनिक साद घातली आहे. ते म्हणतात, “ओम, तू लोकप्रतिनिधी म्हणून जे जे काही करत आहेस ते उत्कृष्ट असेच आहे; पण हे करताना तू स्वतःची काळजी घे, कारण तुझ्यावर लाखो लोक जिवापाड प्रेम करतात. राजकारणी म्हणून नव्हे, तर तुझा मोठा भाऊ म्हणून मला तुझा खूप अभिमान आहे.”
एका वेगळ्या पक्षातील ज्येष्ठ नेत्याने तरुण खासदाराचे केलेले हे मनमोकळे कौतुक, महाराष्ट्राच्या राजकारणात एक सकारात्मक आणि दिलासादायक उदाहरण म्हणून पाहिले जात आहे.