एकीकडे निसर्ग कोपला आहे, आभाळ फाटलं आहे, आणि दुसरीकडे लोकप्रतिनिधी फेसबुकवर ‘सकारात्मकतेचे’ डोस पाजत आहेत. धाराशिव जिल्ह्याचे भाजप आमदार राणा पाटील यांची ताजी फेसबुक पोस्ट याच दुर्दैवी वास्तवावर शिक्कामोर्तब करणारी आहे. सप्टेंबर महिन्यातील प्रलयंकारी पावसाने आणि ढगफुटीसदृश परिस्थितीने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी अद्याप सुकलेले नाही. होत्याचे नव्हते झाले आहे, सोयाबीनची हिरवीगार शेती पिवळी पडून आता पाण्याखाली कुजत आहे, अनेकांच्या जमिनी खरवडून गेल्या आहेत. अशातच आमदार महोदय फेसबुकवर लिहितात, “सोयाबीन : मोठ्या प्रमाणात पीक विमा मिळू शकतोय.. पीक कापणी प्रयोग मात्र व्यवस्थित करून घ्या. प्रशासनाला सूचना दिल्यात.” हा सल्ला म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशी संतप्त भावना जिल्ह्यातून व्यक्त होत आहे.
आमदार राणा पाटील यांची पोस्ट वरकरणी पाहता शेतकऱ्यांच्या हिताची आणि दिलासा देणारी वाटू शकते. पण संतप्त शेतकरी आज एकच प्रश्न विचारत आहे, “अहो आमदार, आधी पाण्यात उतरून बघा! शेतात उरलेली पिके काही दगडावर कोरलेले शिलालेख नाहीत की त्यांचे ‘प्रयोग’ करत बसावे! जे पीक डोळ्यासमोर सडून गेले, त्याची कसली कापणी आणि कसला प्रयोग?”
धाराशिव जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये पावसाने अक्षरशः कहर केला आहे. ज्या शेतकऱ्याचे संपूर्ण शेतच पाण्याखाली आहे, जिथे पीक कापणी सोडा, साधा पाय ठेवायलाही जागा नाही, त्या शेतकऱ्याने हा ‘प्रयोग’ करायचा तरी कसा? सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतानाच पीक पाण्याखाली गेल्याने ते जागेवरच सडू लागले आहे. अशा भयाण आणि विदारक परिस्थितीत, ‘पीक कापणी प्रयोग व्यवस्थित करा’ हा सल्ला देणे म्हणजे वास्तवाचे भान हरपल्यासारखे आहे.
एकीकडे राज्य शासन पीक विम्यासाठी नवनवीन आणि किचकट नियम व अटी लादत आहे. विमा कंपन्यांचे प्रतिनिधी वेळेवर पोहोचत नाहीत, पंचनामे वस्तुनिष्ठ होत नाहीत, अनेक तांत्रिक कारणे पुढे करून शेतकऱ्यांचा हक्क नाकारला जातो, हा आजवरचा अनुभव आहे.
या सर्व जाचक अटींच्या चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकऱ्याला ‘प्रयोग’ करायला सांगण्यापेक्षा, सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून त्यांनी या पीक विम्याच्या जाचक अटी शिथिल करण्यासाठी, विमा कंपन्यांवर दबाव आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. शेतकऱ्याची मागणी स्पष्ट आहे – हे १००% नुकसान गृहीत धरून सरसकट पीक विमा द्या! पंचनाम्याचा आणि प्रयोगांचा फार्स आता बास झाला.
आमदार राणा पाटील यांच्या पोस्टमागील हेतू कोणताही असो, पण त्यांची शब्दयोजना आणि वेळ दोन्हीही चुकले आहे. आज धाराशिवचा शेतकरी संकटाच्या महापुरात बुडत आहे. त्याला गरज आहे ती पाण्याच्या बाहेर काढणाऱ्या हाताची, कोरड्या आश्वासनांच्या फेसबुक पोस्टची नाही.
त्यामुळे आमदारांनी सोशल मीडियावरील ‘सकारात्मक’ संदेशांच्या पलीकडे जाऊन, प्रत्यक्ष बांधावर येऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्याव्यात. शासनाकडे शेतकऱ्यांसाठी तातडीच्या, विनाअट मदतीची मागणी करावी आणि जाचक अटी रद्द करण्यासाठी आवाज उठवावा.
कारण आज शेतकऱ्याला तुमच्या सल्ल्याची नाही, तर ठोस मदतीची अपेक्षा आहे!
– सुनील ढेपे ( शेतकरी पुत्र )