धाराशिव – धाराशिव शहरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढत असून, आता दिवसाढवळ्या घरफोड्या होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील सिध्देश्वर वडगाव परिसरात एका बंद घराच्या पाठीमागील खिडकीची काच फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४०,५०० रुपयांचा ऐवज लंपास केला.
याप्रकरणी अभिजीत मधुकर गुरव (वय ४२, रा. सिध्देश्वर वडगाव) यांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरव यांचे घर रविवारी, दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या खिडकीची काच फोडून घरात प्रवेश केला.
चोरट्याने घरातील कपाटात ठेवलेले १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ३० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. सायंकाळी घरी परतल्यानंतर गुरव यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
गुरव यांच्या फिर्यादीवरून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३) आणि ३०५ अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.