धाराशिव: शहरात एका मद्यधुंद महिंद्रा थार चालकाने भरधाव वेगात गाडी चालवून चार जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मार्केट यार्ड ते छत्रपती शिवाजी चौक दरम्यान हा थरार घडला. विशेष म्हणजे, अपघातास कारणीभूत ठरलेली थार गाडी नवी कोरी होती आणि त्यावर नंबर प्लेटही नव्हती.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाने आपल्या नव्या महिंद्रा थार गाडीवरील नियंत्रण गमावले आणि रस्त्यावरील चार नागरिकांना जोरदार धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने धाराशिव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये शेख साबीर बशीर ( रा. जुना बस डेपो ) याचा समावेश आहे.
अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र,काही तरुणांनी धाडस दाखवत त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपी चालकाला ताब्यात घेतले.
सदर थार गाडी तुळजापूरची असून, चालकाचे नाव भोसले असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी सुरु केली आहे.
या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.