धाराशिव: श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूरकडे येणाऱ्या लाखो पायी भाविकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने वाहतुकीत मोठे बदल जाहीर केले आहेत. कोजागिरी पौर्णिमा आणि मंदिर पौर्णिमेच्या काळात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, दिनांक ४ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान तुळजापूरकडे येणारे अनेक प्रमुख मार्ग सर्व प्रकारच्या हलक्या व जड वाहनांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हे आदेश जारी केले आहेत. नवरात्रोत्सवात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधून लाखो भाविक पायी तुळजापूरला येतात. या काळात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
हे मार्ग राहणार बंद (४ ऑक्टोबर मध्यरात्री ते ७ ऑक्टोबर मध्यरात्रीपर्यंत):
- छत्रपती संभाजीनगर ↔ हैदराबाद (धाराशिव-तुळजापूर-नळदुर्ग मार्गे)
- लातूर ↔ सोलापूर (औसा-तुळजापूर-तामलवाडी मार्गे)
- छत्रपती संभाजीनगर ↔ सोलापूर (येरमाळा-धाराशिव-तुळजापूर मार्गे)
- बार्शी ↔ तुळजापूर (गौडगाव-ढेकरी मार्गे)
प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग:
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने पर्यायी मार्ग जाहीर केले आहेत.
- छत्रपती संभाजीनगर ते हैदराबाद: ही वाहतूक बीड, लातूर, औसा मार्गे उमरगाकडे वळवण्यात आली आहे.
- लातूर ते सोलापूर: वाहतूक मुरुड, ढोकी, येडशी, बार्शी मार्गे सोलापूरकडे जाईल.
- सोलापूर ते छत्रपती संभाजीनगर: वाहतूक बार्शी, येरमाळा मार्गे वळवण्यात आली आहे.
- बार्शीहून तुळजापूरकडे: येणारी वाहने वैराग, धाराशिवमार्गे तुळजापूरला पोहोचतील.
या वाहनांना वगळण्यात आले:
हे वाहतूक निर्बंध अत्यावश्यक सेवांसाठी लागू नसतील. पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने तसेच एसटी महामंडळाच्या बसेसना या नियमातून सूट देण्यात आली आहे.
उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.