धाराशिव: शहरात सोमवारी सायंकाळी एका मद्यधुंद थार चालकाने केलेल्या अपघाताप्रकरणी आता धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाथा सीताराम तुकाराम भोसले (रा. तुळजापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या थार चालकाचे नाव असून, या अपघातात साबेर बशीर शेख (वय ४१, रा. जुना बस डेपो जवळ, धाराशिव) हे जखमी झाले आहेत. या अपघातात चार जणांना चिरडल्याचे समोर आले होते, मात्र पोलिसांनी एकाच व्यक्तीच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ही घटना दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.२० वाजता अण्णाभाऊ साठे चौकात घडली. फिर्यादी साबेर बशीर शेख हे त्यांची मोटारसायकल (क्र. MH 25 AJ 7865) घेऊन रस्ता ओलांडण्यासाठी थांबले होते. त्याचवेळी, विना नंबर प्लेटच्या महिंद्रा थार गाडीचा चालक लाथा सीताराम तुकाराम भोसले याने दारूच्या नशेत अत्यंत भरधाव आणि निष्काळजीपणे गाडी चालवत शेख यांच्या मोटारसायकलला धडक दिली.या अपघातात साबेर शेख यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली. धक्कादायक बाब म्हणजे, अपघातानंतर आरोपी भोसले याने जखमी शेख यांना मदत न करता किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता घटनास्थळावरून पळ काढला.
पोलिसांची कारवाई
या घटनेनंतर साबेर शेख यांनी ३० सप्टेंबर रोजी दिलेल्या जबाबावरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४६/२०२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चालकावर भारतीय न्याय संहिता कलम १२५(a) (धोकादायक पद्धतीने वाहन चालवून दुखापत करणे) आणि कलम २८१ (सार्वजनिक मार्गावर निष्काळजीपणे वाहन चालवणे) यासह मोटार वाहन अधिनियम कलम १८४ (धोकादायक ड्रायव्हिंग) आणि कलम १८५ (मद्यपान करून गाडी चालवणे) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कराळे करत आहेत. सुरुवातीच्या माहितीनुसार चालकाला ताब्यात घेतल्याचे वृत्त होते, परंतु अधिकृत नोंदीनुसार अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.