धाराशिव: सासुला गोळ्या देण्याच्या बहाण्याने शेती हडप करण्यासाठी आला आहे, असा आरोप करत एका पन्नास वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी तीन भावांविरुद्ध ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीमंत श्रीहरी चव्हाण (वय ५० वर्षे, रा. म्होतरवाडी, ता. जि. धाराशिव) असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते २८ सप्टेंबर रोजी रात्री किणी येथे त्यांच्या सासुला गोळ्या देण्यासाठी गेले होते. त्यावेळी महेश भीमराव हाजगुडे, प्रकाश भीमराव हाजगुडे आणि आकाश भीमराव हाजगुडे (सर्व रा. किणी, ता. जि. धाराशिव) यांनी त्यांना अडवले.
“तू तुझ्या सासुला गोळ्या देण्यासाठी आला नाहीस, तर आमची शेती हडप करण्यासाठी आला आहेस,” असे म्हणत आरोपींनी चव्हाण यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करून जखमी केले. “पुन्हा येथे आलास तर जीवे ठार मारून टाकू,” अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेनंतर श्रीमंत चव्हाण यांनी २९ सप्टेंबर रोजी ढोकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी महेश, प्रकाश आणि आकाश हाजगुडे या तिघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५, ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.