नळदुर्ग: महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुमारे १५,५०० रुपये किमतीचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका व्यक्तीवर नळदुर्ग पोलिसांनी कारवाई केली आहे. ही घटना सोमवारी (दि. २९ सप्टेंबर) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास तुळजाभवानी साखर कारखाना परिसरात घडली.
विकास तानाजी कांबळे (वय ३२ वर्षे, रा. तुळजाभवानी साखर कारखाना समोर, नळदुर्ग) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नळदुर्ग पोलीस तुळजाभवानी साखर कारखाना परिसरात गस्त घालत असताना त्यांना आरोपी विकास कांबळे याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या.
पोलिसांनी त्याची तपासणी केली असता, त्याच्याकडे विक्रीसाठी ठेवलेला ‘विमल पान मसाला’ आणि ‘V-1’ कंपनीची तंबाखू असलेले प्रत्येकी १०४ पाऊच (पुढे) आढळून आले. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून त्याची एकूण किंमत १५,५०० रुपये आहे.
याप्रकरणी, नळदुर्ग पोलिसांनी आरोपी विकास कांबळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे कलम ५९ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.