उमरगा : शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी चिलीमद्वारे गांजाचे सेवन करणाऱ्या दोघांना उमरगा पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (एन.डी.पी.एस अॅक्ट) स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली कारवाई पंतगे रोडवरील पाटबंधारे कार्यालयाच्या पाठीमागे करण्यात आली. येथे राम भागवत जाधव (वय ३० वर्षे, रा. कवठा, ह.मु. कुंभार पट्टी, उमरगा) हा इसम झाडाखाली चिलीममध्ये गांजा भरून त्याचे सेवन करत असताना पोलिसांना दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास आढळून आला.
त्यानंतर दुसरी कारवाई शहरातील हुतात्मा स्मारक उद्यानात करण्यात आली. येथे बाळू महादू कावळे (वय ४० वर्षे, रा. कोळीवाडा, उमरगा) हा इसम झाडाखाली बसून चिलीमद्वारे गांजा ओढत असताना पोलिसांच्या निदर्शनास आला. ही घटना सायंकाळी ४ वाजून २० मिनिटांच्या सुमारास घडली.
या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन आरोपींविरुद्ध एन.डी.पी.एस अॅक्ट १९८५ च्या कलम ८(क) आणि २७ अन्वये उमरगा पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत. या घटनांमुळे शहरातील अवैध अमली पदार्थांच्या सेवनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.