धाराशिव: एकीकडे अतिवृष्टीने खरीप पिकांचे पूर्णपणे नुकसान झाल्याने धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे, तर दुसरीकडे विविध बँकांनी पीक कर्ज वसुलीची मोहीम सुरू केल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी नोटिसा बजावण्यात येत असल्याने त्यांच्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर मतदारसंघातील धाराशिव तालुक्यातील गोगाव , नांदुर्गा , करजखेडा परिसरातील जवळपास ३०० शेतकऱ्यांना बँकेकडून पीक कर्ज वसुलीच्या नोटिसा मिळाल्या आहेत. यावर्षी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून मदतीची अपेक्षा असताना, बँकांनी वसुलीचा तगादा लावल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
या प्रकरणी स्थानिक भाजपचे आमदार राणा पाटील यांनी शेतकऱ्यांना बँकांच्या नोटिसा थांबवण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. मात्र, दोनच दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना पुन्हा नोटिसा मिळाल्याने त्यांच्या आश्वासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या सरकारी अनास्थेवर आणि बँकांच्या भूमिकेवर शिवसेना (ठाकरे गट) नेते जगदीश पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “हे सरकार शेतकऱ्यांच्या जिवावर उठले आहे,” असे म्हणत त्यांनी या सरकारवर कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
एकीकडे अस्मानी संकट आणि दुसरीकडे सुलतानी संकट यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे खचला असून, यावर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सरकार आणि प्रशासन यावर काय उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.