धाराशिव : नागरिकांशी उद्धट वर्तन, कामात दिरंगाई आणि कर्तव्यात कसूर केल्याच्या गंभीर आरोपांवरून धाराशिव नगरपरिषदेचे रचना सहायक प्रकाश वशिष्ट पवार यांना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, श्री. पवार यांच्याविरोधात अनेक दिवसांपासून तक्रारी प्राप्त होत होत्या. कामामध्ये पक्षपात करणे, नागरिकांची कामे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवणे, शासकीय कामकाजासाठी येणाऱ्या अभ्यागतांना आणि ज्येष्ठ नागरिकांना एकेरी भाषेत बोलून अरेरावीची वागणूक देणे असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.
या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले ते दिनांक ८ सप्टेंबर, २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत. शहरातील वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमण आणि महसुली नोंदीबाबतच्या या बैठकीत, वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांसमोरच अनेक नागरिकांनी श्री. पवार यांच्या कार्यपद्धतीबद्दल मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या. या तक्रारींवर चर्चा सुरू असताना श्री. पवार यांनी नागरिकांशी उद्धट आणि मोठ्या आवाजात अरेरावीची भाषा वापरली, ज्यामुळे प्रशासनाची प्रतिमा मलीन झाली.
या बैठकीतील वर्तनामुळे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी श्री. पवार यांना ८ सप्टेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच, वक्फ जमिनीवरील अतिक्रमणांसंदर्भात कारवाई करण्याच्या आणि संबंधित माहिती सादर करण्याच्या सूचना देऊनही त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. हे कृत्य अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी आपल्या नोटीसमध्ये नमूद केले होते.
निलंबनाच्या आदेशातील प्रमुख अटी:
- श्री. पवार यांना या आदेशाच्या दिनांकापासून पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले आहे.
- निलंबन काळात त्यांचे मुख्यालय सहायक संचालक, नगररचना, धाराशिव यांचे कार्यालय राहील आणि त्यांना पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.
- निलंबन काळात त्यांना नियमांनुसार निर्वाह भत्ता देय राहील.
- या कालावधीत त्यांना कोणतीही खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. असे केल्यास ते शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरतील आणि निर्वाह भत्ता नाकारला जाईल.
- निर्वाह भत्ता मिळण्यापूर्वी, आपण कोणताही खासगी व्यवसाय किंवा नोकरी करत नाही, असे प्रमाणपत्र त्यांना सादर करावे लागेल.