धाराशिव: शहरात कत्तलीच्या उद्देशाने निर्दयपणे बांधून ठेवलेल्या दोन जर्सी गायींची धाराशिव शहर पोलिसांनी सुटका केली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीवर प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर मियाँ शेख (वय ३७, रा. सांजा वेस गल्ली, धाराशिव) असे आरोपीचे नाव आहे.
ही घटना शहरातील खिरणीमळा परिसरात दिनांक ०३ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७.२५ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. आरोपी समीर शेख याने दोन जर्सी जातीच्या गायींना चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता अत्यंत निर्दयतेने कत्तलीसाठी बेकायदेशीररीत्या बांधून ठेवले होते. या गायींची किंमत अंदाजे ४८,००० रुपये आहे.
धाराशिव शहर पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही गायींना ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली.
याप्रकरणी, पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद नोंदवून आरोपी समीर शेख याच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियमाचे कलम ११ (१) (ब) तसेच प्राणी संरक्षण अधिनियमाचे कलम ५(अ)(१) आणि ९(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
मुरुममध्ये गोमांस विक्रीचा प्रयत्न फसला, २१७ किलो मांस आणि रिक्षा जप्त
मुरुम : गोवंशीय प्राण्यांची कत्तल करून मांस विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीवर मुरुम पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत २१७ किलो गोमांस आणि एक रिक्षा असा एकूण ७३,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इसाक अली इस्माईल नदाफ (वय २८) असे आरोपीचे नाव आहे.
ही कारवाई शुक्रवारी, ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मुरुम-मुरुम मोड रस्त्यावरील महालिंगरायवाडी शिवारात करण्यात आली. आरोपी इसाक नदाफ (रा. नेहरुनगर, मुरुम) हा त्याच्या रिक्षा (क्र. एमएच २४ ए.टी. ३८६७) मधून गोमांस विक्रीसाठी घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मुरुम पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून रिक्षा थांबवली आणि तपासणी केली. तपासणीदरम्यान, रिक्षामध्ये ४३,४०० रुपये किमतीचे २१७ किलो गोवंशीय मांस आढळून आले. पोलिसांनी तात्काळ मांस आणि वाहतुकीसाठी वापरलेली रिक्षा जप्त केली.
याप्रकरणी पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद नोंदवून आरोपी इसाक नदाफ याच्याविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियमाच्या कलम ५(सी) आणि ९(ए) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मुरुम पोलीस करत आहेत.