धाराशिव: जिल्ह्यात चोरट्यांनी पुन्हा एकदा आपले धाडस दाखवत परंडा, कळंब आणि येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी आणि जबरी चोरीच्या घटना घडवून आणल्या आहेत. या घटनांमध्ये एकूण ५ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
परंड्यात दिवसाढवळ्या घरफोडी, पावणेतीन लाखांचा मुद्देमाल चोरला
परंडा तालुक्यातील उंडेगाव येथे एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख ९४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सुमन अभिमान डुकळे (वय ४५) या शनिवारी, दि. ०४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी दोन वाजेच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडले आणि घरातील कपाटात ठेवलेल्या चार नवीन साड्या, ६५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ३०,००० रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी सुमन डुकळे यांच्या फिर्यादीवरून आंबी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कळंब तालुक्यात दोन घरे फोडली, १ लाख ९० हजारांची चोरी
कळंब तालुक्यातील गंभीरवाडी येथेही चोरट्यांनी दोन घरे फोडून १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. लहू उत्तरेश्वर गायकवाड (वय ४९) यांच्या शेतातील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १८ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ६०,००० रुपये रोख रक्कम, असा एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरला. त्याचबरोबर, त्यांच्याच परिसरातील किसकिंदा अंकुश गायकवाड यांच्या घरातून २० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २५,००० रुपये रोख रक्कम, असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. ही घटना दि. ०३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महामार्गावर महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
बीड-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (NH 52) येरमाळ्याजवळ एका पेट्रोल पंपावर थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दोन अज्ञात व्यक्तींनी हिसकावून नेल्याची घटना घडली. राधा परप्पा पुजेरी (वय २८, रा. यमकल मर्डी, जि. बेळगाव, कर्नाटक) या आपल्या कुटुंबीयांसह प्रवास करत होत्या. दि. ०४ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास विश्रांतीसाठी त्या सिद्धिविनायक पेट्रोल पंपावर थांबल्या असता, दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाचे सुमारे ४०,००० रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून पळ काढला. या घटनेप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जिल्ह्यात एकाच दिवशी उघडकीस आलेल्या या घटनांमुळे पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.