तुळजापूर – श्री तुळजाभवानी देवीच्या मूर्तीमागे लावण्यात आलेल्या नव्या चांदीच्या प्रभावाळीवर दात्याचे नाव कोरल्याने निर्माण झालेला वाद ‘धाराशिव लाइव्ह’च्या बातमीनंतर अखेर मिटला आहे. या वृत्ताची तातडीने दखल घेत मंदिर प्रशासनाने प्रभावाळीवरील भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी सौ. अर्चनाताई पाटील यांचे नाव हटवले आहे. त्याजागी आता देवीचा पवित्र मंत्र “सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तु ते॥” कोरण्यात आला आहे.
पालकमंत्र्यांनी टोचले कान
भोपे पुजारी मंडळाने आक्षेप घेतल्यानंतर आणि बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर हे प्रकरण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना फोन करून त्यांची कानउघाडणी केली. “जर आम्ही देवीला सोन्याची वस्तू अर्पण केली, तर त्यावर आमचे नाव टाकणे योग्य ठरेल का?” असा थेट आणि रोखठोक सवाल करत सरनाईक यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
नावाच्या जागी आला मंत्र
पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर आणि भाविकांचा वाढता रोष लक्षात घेता, मंदिर प्रशासनाने तातडीने कारवाई केली. प्रभावाळीवर कोरलेले ‘सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून अर्पण’ हे नाव काढून टाकण्यात आले. आता त्या पवित्र स्थानी देवीचा श्लोक कोरण्यात आल्याने वादावर पडदा पडला आहे. प्रशासनाच्या या निर्णयाचे भोपे पुजारी मंडळ आणि भाविकांमधून स्वागत होत आहे.