तुळजापूर – अपंगत्वावरून हिणवत एका ४० वर्षीय व्यक्तीला “लंगड्या, तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत लोखंडी कत्तीने प्राणघातक हल्ला केल्याची संतापजनक घटना तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे घडली आहे. या अमानुष हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी बाप-लेकाविरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पीडित अण्णा हनुमंत देवगुंडे (वय ४०, रा. काक्रंबा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी देवगुंडे हे ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास काक्रंबा शिवारातील बस स्टॉपजवळील एका चहाच्या हॉटेलसमोर थांबले होते. यावेळी आरोपी शुभम उर्फ दादा कुमार देवकते आणि कुमार कोंडीबा देवकते (दोघे रा. काक्रंबा) यांनी संगनमत करून त्याठिकाणी आले.
फिर्यादी हे अपंग असल्याची माहिती असतानाही आरोपींनी त्यांना जाणीवपूर्वक हिणवले. “लंगड्या, तुला जिवंत सोडणार नाही,” असे म्हणत आरोपींनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांनी मिळून देवगुंडे यांना लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी कत्तीने मारहाण करून गंभीर जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर अण्णा देवगुंडे यांनी ६ ऑक्टोबर रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी बाप-लेकावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार, तसेच ‘अपंग व्यक्तीचा अधिकार अधिनियम कलम ९२’ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. एका अपंग व्यक्तीवर झालेल्या या निर्दयी हल्ल्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.