धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात विविध प्रकारच्या गुन्हेगारी घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गाडीत झोपलेल्या व्यक्तीला लाखोंचा ऐवज लुटल्याची घटना, दिवसाढवळ्या घरात घुसून रोकड चोरल्याची घटना आणि कॉलेजसमोरून दुचाकी लंपास झाल्याच्या घटना ताज्या असतानाच, या सर्व प्रकरणांमध्ये विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत. एकाच दिवशी घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
महामार्गावर गाडीत झोपलेल्या व्यक्तीला लुटले
कळंब तालुक्यातील चोंदे गल्ली येथे राहणारे आकाश अनिल कवडे (वय ३२) हे दि. ०४ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास इंदापूर येथील साखर कारखान्यासमोरील राष्ट्रीय महामार्ग ५२ वर आपल्या गाडीमध्ये झोपले होते. यावेळी दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीजवळ येऊन कवडे यांच्या गळ्यातील सहा तोळ्यांचे सोन्याचे लॉकेट, एक तोळ्याची सोन्याची अंगठी आणि तीन ग्रॅमची सोन्याची बाळी असा एकूण ३ लाख ६५ हजार रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने लुटून पोबारा केला. याप्रकरणी आकाश कवडे यांनी ६ ऑक्टोबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सांजा येथे घरफोडी, १९ वर्षीय तरुणास अटक
जिल्ह्यातील सांजा गावात दिवसाढवळ्या घरफोडीची घटना घडली असून, पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपीला अटक केली आहे. मुबारक दगडूसाहेब सय्यद (वय ६७) यांच्या घरात दि. ०६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबाराच्या दरम्यान, विष्णू विश्वास सूर्यवंशी (वय १९, रा. सांजा) या तरुणाने घरात घुसून कपाटातील ४० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. फिर्यादी मुबारक सय्यद यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आनंदनगर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी आरोपी विष्णू सूर्यवंशी यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सुरू आहे.
परंड्यात कॉलेजसमोरून दुचाकी लंपास
परंडा शहरातील हंसराज मठ येथे राहणारा विद्यार्थी समर्थ पुरुषोत्तम आवटे (वय २०) याची ४५ हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल (क्र. एमएच २५ बीडी ९२९६) अज्ञात चोराने चोरून नेली. ही घटना २१ ऑगस्ट रोजी दुपारी १ ते ४ च्या दरम्यान परंडा येथील न्यू कॉलेजच्या गेटसमोर घडली होती. याप्रकरणी समर्थ आवटे याने ६ ऑक्टोबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
एकाच दिवशी जिल्ह्यात लुटमार, घरफोडी आणि वाहनचोरीचे गुन्हे दाखल झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.