मुरूम – येऊ घातलेल्या मुरुम नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी आज नगर परिषदेच्या सभागृहात प्रभागनिहाय सदस्यपदासाठीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. नगराध्यक्ष पद सर्वसाधारण गटासाठी राखीव ठेवण्यात आले असून, एकूण २० सदस्य जागांपैकी १० जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. मात्र, खुल्या प्रवर्गातील पुरुष उमेदवारांना केवळ सात जागांवरच निवडणूक लढवता येणार असल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
बुधवारी सकाळी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून ही आरक्षण सोडत काढण्यात आली. शहराच्या एकूण १० प्रभागांमधून प्रत्येकी दोन सदस्य निवडले जाणार आहेत. या निवडणुकीसाठी अनेक पुरुष उमेदवार इच्छुक होते आणि तयारीला लागले होते, मात्र आता केवळ सात जागा ‘खुला सर्वसाधारण’ प्रवर्गासाठी निघाल्याने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. या आरक्षणामुळे अनेक प्रस्थापितांना आणि ‘गुडघ्याला बाशिंग बांधून’ बसलेल्यांना मोठा धक्का बसला आहे.
या आरक्षण सोडतीमुळे आता शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून, इच्छुक उमेदवार आपापल्या आरक्षित जागेनुसार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात करतील.
आरक्षणाची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
एकूण जागा:
- एकूण सदस्य संख्या: २०
- एकूण महिला: १०
- एकूण अनुसूचित जाती (अ. जा.): ३ (पैकी २ महिला)
- एकूण नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना. मा. प्र.): ५ (पैकी ३ महिला)
- खुला महिला: ५
- खुला सर्वसाधारण: ७
प्रभागनिहाय आरक्षण सोडत:
प्रभाग क्र. | जागा ‘अ’ | जागा ‘ब’ |
१ | ना. मा. प्र. (महिला) | खुला सर्वसाधारण |
२ | ना. मा. प्र. (सर्वसाधारण) | खुला महिला |
३ | अ. जा. (महिला) | खुला सर्वसाधारण |
४ | ना. मा. प्र. (महिला) | खुला सर्वसाधारण |
५ | ना. मा. प्र. (सर्वसाधारण) | खुला महिला |
६ | अ. जा. (सर्वसाधारण) | खुला महिला |
७ | खुला महिला | खुला सर्वसाधारण |
८ | ना. मा. प्र. (महिला) | खुला सर्वसाधारण |
९ | खुला महिला | खुला सर्वसाधारण |
१० | अ. जा. (महिला) | खुला सर्वसाधारण |