कळंब : लग्नाचे आमिष दाखवून ३६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची आणि तिचे छायाचित्र व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी कळंब तालुक्यातील एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना नोव्हेंबर २०२४ ते जून २०२५ या कालावधीत घडली.
पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती कळंब तालुक्यातील एका गावात राहते. त्याच गावातील एका तरुणाने तिच्याशी ओळख वाढवली. त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. नोव्हेंबर २०२४ ते जून २०२५ या आठ महिन्यांच्या कालावधीत, आरोपीने पीडिता घरी असताना तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले.
याशिवाय, आरोपीने पीडितेला शिवीगाळ करून तिचे काढलेले छायाचित्र आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी करण्याची धमकी दिली. अखेर, या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने मंगळवारी, दि. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी कळंब पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पीडितेच्या फिर्यादीवरून कळंब पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४, ६९, ३५२, ३५१(२) अन्वये लैंगिक अत्याचार, फसवणूक आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.