धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये झालेल्या घटनांमध्ये चोरट्यांनी रात्री उभ्या असलेल्या ट्रकच्या टाकीतून डिझेल, शेतकऱ्याचा सौरऊर्जा पंप, विविध ठिकाणांहून मोटरसायकली आणि तुळजापुरात दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लंपास केले आहे. या सर्व घटनांप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
विविध पोलीस ठाण्यात दाखल झालेले गुन्हे:
- येरमाळा: ट्रक चालकाला झोप अनावर, २१ हजारांचे डिझेल चोरीला – राहुल गोविंद मंदे (वय २७, रा. बनवस, जि. परभणी) हे ट्रकचालक मंगळवारी मध्यरात्री सुरत्नापूर फाट्याजवळील श्री स्वामी समर्थ हॉटेलसमोर ट्रक (क्र. एमएच १२ टीव्ही ७५९५) उभा करून गाडीत झोपले होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या ट्रकच्या डिझेल टाकीचे कुलूप तोडून सुमारे २१,१६० रुपये किमतीचे २३० लिटर डिझेल चोरून नेले. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
- वाशी: शेतकऱ्याचा १५ हजारांचा सौर पंप चोरला – वाशी तालुक्यातील गोजवाडा येथील शेतकरी भिकचंद मुरलीधर थोरबोले (वय ६५) यांच्या शेतातील विहिरीवर बसवलेली ‘एक शक्ती सोलार’ कंपनीची ५ हॉर्सपॉवरची सौर मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या मोटारीची किंमत अंदाजे १५,००० रुपये आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- भूम: घरासमोरून ४० हजारांची मोटरसायकल लंपास – सादिक कादरबाशा शेख (वय ४५, रा. भुम) यांची ४०,००० रुपये किमतीची टीव्हीएस स्टार सिटी मोटरसायकल (क्र. एमएच २५ एएक्स २१๘३) त्यांनी भुम येथील इंदिरानगरमधील घरासमोर उभी केली होती. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. याप्रकरणी भुम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
- तुळजापूर: पार्किंगमधून १.१ लाखांच्या दोन मोटारसायकली चोरीला – तुळजापूर-धाराशिव रस्त्यावरील पार्किंगमधून दोन वेगवेगळ्या मोटरसायकली चोरीला गेल्या आहेत. यामध्ये उमेश बिभीषण कदम यांची युनिकॉर्न (क्र. एमएच २५ बीबी ३३४३) आणि राम लक्ष्मण जिंगोणी यांची हिरो मोटरसायकल (क्र. एमएच १३ ईव्ही ४२२५) यांचा समावेश आहे. दोन्ही गाड्यांची एकूण किंमत १,१०,००० रुपये असून, तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
- तुळजापूर: गर्दीचा फायदा घेत भाविकेचे १ लाखांचे मिनीगंठण पळवले – कलबुर्गी (कर्नाटक) येथून श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या महादेवी शिवाजी पठाणशेट्टी (वय ३४) या सुवर्णश्वर गणपती मंदिराजवळून जात होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे १ लाख रुपये किमतीचे दोन तोळ्याचे सोन्याचे मिनीगंठण चोरून नेले. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.