धाराशिव : धाराशिव जिल्हा पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून, मंगळवारी एकाच दिवशी तुळजापूर, मुरुम आणि नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका जुगाराच्या अड्ड्यांवर छापे टाकले. या कारवाईत पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १८,७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
तुळजापूरमध्ये दोन ठिकाणी कारवाई
तुळजापूर पोलिसांनी जुगार विरोधी कारवाई दरम्यान दोन ठिकाणी छापे टाकले. पहिल्या कारवाईत, भवानी कुंडाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत सोरट मटका चालवणाऱ्या शंकर अनिल पारधे (वय २६, रा. वेताळनगर, तुळजापूर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६,२०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. दुसऱ्या कारवाईत, घाटशीळ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर नागनाथ दत्ता गायकवाड (वय ३३, रा. काक्रंबा) याच्यावर कारवाई करत त्याच्याकडून २,९५० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले.
मुरुम पोलिसांचा अचलेरमध्ये छापा
मुरुम पोलिसांनी अचलेर येथील बसस्थानक चौकातील शिवनेरी हॉटेलसमोर छापा टाकला. यावेळी कल्याण मटका चालवणाऱ्या महेश भारती सोमवंशी (वय ४०, रा. अचलेर) याला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ५९० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
नळदुर्ग पोलिसांची जळकोटमध्ये कारवाई
नळदुर्ग पोलिसांनी जळकोट येथे कारवाई करत कल्याण मटका चालवणाऱ्या बालाजी प्रकाश गंगणे (वय ३२, रा. जळकोट) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सर्वाधिक ९,०३० रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
या सर्व कारवाया मंगळवारी (दि. ०७ ऑक्टोबर) करण्यात आल्या असून, जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात मोहीम तीव्र करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.