कळंब: पुण्यामध्ये घर घेण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये आणले नाहीत आणि मुलगा झाला नाही, या कारणांवरून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका ३१ वर्षीय विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना कळंब तालुक्यातील ईटकुर येथे घडली आहे. याप्रकरणी मयत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा कळंब पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अश्विनी बाळासाहेब शिंदे (वय ३१, रा. ईटकुर, ता. कळंब) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. अश्विनी यांना त्यांचे पती बाळासाहेब शंकर शिंदे हे पुण्यामध्ये घर घेण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावत होते. तसेच, मुलगा झाला नाही या कारणावरूनही त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करत होते.
पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अश्विनी यांनी दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी विषारी औषध सेवन करून आपले जीवन संपवले.
या घटनेनंतर, मयत अश्विनी यांचे वडील वसंत बाबुराव कोकाटे (वय ६५, रा. ईटकुर) यांनी ८ ऑक्टोबर रोजी कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी पती बाळासाहेब शंकर शिंदे याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत.