परंडा: शहरातील एका ३० वर्षीय तरुणाला विनाकारण शिवीगाळ करून, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘तुला कोठे जायचे ते जा’ अशी धमकी देत आरोपीने तरुणाला गंभीर जखमी केले. ही घटना ७ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास येथील चौतमहल यांच्या बंगल्याजवळ घडली.
याप्रकरणी जखमी तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात परंडा पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावण बापु पवार (वय ३० वर्षे, रा. गारभवानी नगर, परंडा) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास श्रावण पवार हे चौतमहल यांच्या बंगल्याजवळ असताना, तेथे आलेल्या बाबासाहेब चंद्रकांत कोळी (रा. समता नगर, परंडा) याने त्यांना कोणताही कारण नसताना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यानंतर आरोपी बाबासाहेब कोळी याने श्रावण पवार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि आपल्याजवळील चाकूने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच, ‘तुला कोठे जायचे ते जा’ अशी धमकीही दिली.
या हल्ल्यानंतर श्रावण पवार यांनी त्याच दिवशी परंडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी बाबासाहेब कोळी याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१)(२), ११५(२), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, पोलीस पुढील तपास करत आहेत.