तुळजापूर: नवीन बसस्थानकावर सोडतो असे सांगून दोघा प्रवाशांना विश्वासात घेऊन निर्जनस्थळी नेले, आणि तिथे कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत त्यांच्याकडील 24,200 रुपयांची रोकड जबरीने हिसकावून घेतल्याची धक्कादायक घटना तुळजापुरात घडली आहे. ही घटना बुधवारी, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली असून, याप्रकरणी चार आरोपींविरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मल्लिकार्जुन भिमाशंकर भुस्ते (वय ४२ वर्षे, रा. केगाव, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) हे आपल्या मित्रासोबत बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तुळजापूर येथील जुने बसस्थानकासमोर थांबले होते. यावेळी प्रशांत प्रभाकर भिसे (रा. नरीमन पॉईंट, तुळजापूर), रविराज भारत देवकर (रा. वासुदेव गल्ली, तुळजापूर), सुरज आनंतवीर (रा. जिजामाता नगर, तुळजापूर) आणि ओम निलेश जानराव (रा. एमएसईबी सबस्टेशन जवळ, तुळजापूर) हे चौघे जण तिथे आले.
या चौघांनी भुस्ते आणि त्यांच्या मित्राला ‘तुम्हाला नवीन बसस्थानकावर सोडतो’ असे सांगून त्यांना मोटरसायकलवर बसवले. मात्र, त्यांना बसस्थानकावर न नेता पुढे एका तलावाजवळ निर्जनस्थळी नेण्यात आले. त्या ठिकाणी आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून आणि कोयत्याने मारहाण करून दोघांनाही जखमी केले. त्यानंतर, त्यांच्या खिशात असलेले एकूण 24,200 रुपये जबरदस्तीने हिसकावून घेऊन पोबारा केला.
या घटनेनंतर मल्लिकार्जुन भुस्ते यांनी तातडीने तुळजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चारही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(६) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.