धाराशिव: कत्तलीच्या उद्देशाने अत्यंत निर्दयपणे वाहतूक केल्या जाणाऱ्या ८ गायींची धाराशिव ग्रामीण पोलिसांनी सुटका केली आहे. चिलवडी-धाराशिव रस्त्यावर पिंपरी शिवारात पहाटेच्या वेळी ही मोठी कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दोन पिकअप वाहनांसह एकूण १० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, सोलापूर जिल्ह्यातील दोन आरोपींविरोधात प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
धाराशिव ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, बुधवारी, ८ ऑक्टोबर रोजी पहाटे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास पिंपरी शिवारात सापळा रचण्यात आला होता. यावेळी चिलवडीकडून धाराशिवच्या दिशेने येणारी दोन पिकअप वाहने (क्र. एमएच ४५-४९६१ आणि एमएच १२ डीटी ५०१४) संशयास्पदरीत्या आढळून आली. पोलिसांनी दोन्ही वाहने थांबवून तपासणी केली असता, त्यात अत्यंत क्रूरपणे जनावरे कोंबल्याचे दिसून आले.
प्रत्येक पिकअपमध्ये ४ जर्सी गायी अशा एकूण ८ गायी आढळून आल्या. या सर्व जनावरांचे तोंड आणि चारही पाय दोरीने घट्ट बांधलेले होते. त्यांना चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता अत्यंत निर्दयीपणे कत्तलीसाठी नेले जात होते.
पहिल्या कारवाईत, पोलिसांनी मज्जु जावेद कुरेशी (वय २२, रा. मोहोळ, जि. सोलापूर) याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील पिकअप गाडी आणि ४ गायी असा एकूण ५ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसऱ्या कारवाईत, सुरज विनोद जाधव (वय २७, रा. दत्तनगर, मोहोळ, जि. सोलापूर) याच्या ताब्यातील पिकअप आणि ४ गायी असा एकूण ४ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी, पोलिसांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद देऊन दोन्ही आरोपींविरोधात प्राण्यास क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११(१) (ड), (ई) अन्वये स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत. या कारवाईमुळे अवैध प्राणी वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.