धाराशिव : जिल्हा परिषद बांधकाम विभागात कंत्राट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका ठेकेदाराविरोधात आनंदनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश नवनाथ कोकाटे (रा. निपाणी, ता. भूम, जि. धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी ठेकेदाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कोकाटे याने सन २०२० ते २०२२ या कालावधीत जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून कंत्राट आणि कंत्राटदार प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी बनावट ‘वर्क डन अँड वर्क इन हँड’ प्रमाणपत्रे आणि इतर खोटी कागदपत्रे सादर केली. या बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने विभागाची दिशाभूल करून फसवणूक केली.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता विवेकराज विलासराव वायचळ (वय ५७) यांनी शुक्रवारी, १० ऑक्टोबर २०२५ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रमेश कोकाटे विरोधात भारतीय न्याय संहिता 331(4),305 अन्वये अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आनंदनगर पोलीस करत आहेत.