बेंबळी : करजखेडा चौकातील एका सराफा दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मुद्देमालासह सुमारे ४ लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री ते शुक्रवारी सकाळच्या दरम्यान घडली. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महादेव बब्रुवान कदम (वय ६४, रा. कानेगाव) यांचे करजखेडा चौकात रुक्मिणी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. गुरुवारी, ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता ते दुकान बंद करून घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी १० ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास ते दुकान उघडण्यासाठी आले असता, त्यांना दुकानाचे लोखंडी चॅनेल गेट आणि शटर तुटलेले दिसले.
चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून ८८ नग चांदीचे पैंजण, ६० नग चांदीचे कडदोरे, १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मोरणी, एक एलईडी टीव्ही आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने एक डीव्हीआर मशीन असा एकूण ४,५९,००० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
घटनेची माहिती मिळताच बेंबळी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. महादेव कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, बेंबळी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४) आणि ३०५ अन्वये घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस श्वान पथकाच्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करत असून पुढील तपास सुरू आहे.