धाराशिव: “आम्ही किती मोठी कामगिरी केली,” हे सांगण्यासाठी पोलीस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकांनी पत्रकार परिषद घेतली. स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने केलेला २ कोटी १३ लाखांचा अपहार, चोरी उघडकीस आणल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेतली. मात्र, या चकचकीत कामगिरीमागे दडपलेल्या एका प्रकरणाची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या आरोपीला पकडले, त्याने चोरीच्या पैशातून घेतलेली नवी कोरी कार, जी गुन्ह्यातील महत्त्वाचा मुद्देमाल आहे, ती एका पोलीस कर्मचाऱ्यानेच अपघातात तोडली. आता हे प्रकरण दाबून पोलीस नेमके काय लपवत आहेत?
नेमकं काय घडलं?
तुळजापूरच्या लोकमंगल मल्टीस्टेटमधील चोरीचा मुख्य सूत्रधार, पोलीस शिपाई दत्ता कांबळे याला स्थानिक गुन्हे शाखेने नागपुरातून अटक केली. त्याने चोरीच्या पैशांतून नुकतीच एक टाटा जेस्ट (Tata Zest) कार खरेदी केली होती, ज्यावर साधा नंबरही नव्हता. पोलिसांनी आरोपीसह ही कार जप्त केली.
‘धाराशिव लाइव्ह’च्या विश्वसनीय सूत्रांनुसार, ही नवी कोरी कार एक पोलीस कर्मचारी नागपूरहून धाराशिवला घेऊन येत होता. वाटेत, त्या कर्मचाऱ्याने गाडी थेट डिव्हायडरवर घातली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. अखेर, मोठ्या कामगिरीचा पुरावा असलेली ही कार टोचन लावून धाराशिवला आणावी लागली आणि आता ती दुरुस्तीसाठी एका गॅरेजमध्ये धूळ खात पडून आहे.
उत्तर न मिळालेले प्रश्न:
पोलीस दलाने आपल्या यशाचा डंका पिटला, पण या अपघाताचा साधा उल्लेखही केला नाही. त्यामुळे काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत:
- अपघात कोणी केला? गुन्ह्यातील महत्त्वाचा मुद्देमाल चालवणाऱ्या आणि त्याचे नुकसान करणाऱ्या त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव काय?
- नोंद का नाही? सरकारी कामात अडथळा आणि गुन्ह्यातील मुद्देमालाचे नुकसान होऊनही, संबंधित पोलीस ठाण्यात या अपघाताची साधी नोंद का करण्यात आली नाही? कायद्याचे रक्षकच कायदा का पाळत नाहीत?
- माहिती दडवली का? या गंभीर प्रकरणाची माहिती पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना दिली आहे का? की त्यांच्यापासूनही हे सत्य लपवून ठेवण्यात आले?
एकीकडे, गोरगरिबांचे पैसे परत मिळवून दिल्याबद्दल श्रेय घ्यायचे आणि दुसरीकडे, स्वतःच्या कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे झालेल्या नुकसानीवर पडदा टाकायचा, हा दुटप्पीपणा कशासाठी? पत्रकार परिषदेत केवळ सोयीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रकार पोलीस दलाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. आता वरिष्ठ अधिकारी या दडपलेल्या प्रकरणाची चौकशी करून सत्य समोर आणतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.