भूम: येथील श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ, सुकटा (ता. भूम) येथे अनुकंपा तत्त्वावर शिक्षक पदासाठी पात्र असलेल्या उमेदवाराला डावलून त्याची शिपाई पदावर नियुक्तीसाठी दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप सोलापूर जिल्हा मागासवर्गीय शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने केला आहे. या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष व सचिव संगनमत करून उमेदवाराला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवत आहेत, असा आरोप करत संघटनेने तात्काळ कारवाई न झाल्यास अघोषित आंदोलन आणि ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्रा. बाबासाहेब भालेराव यांनी शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनानुसार, श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळाचे मृत कर्मचारी काशिनाथ नागटिळक यांचे वारस संघर्ष संजय नागटिळक हे अनुकंपा तत्त्वावर शिक्षक पदासाठी पात्र आहेत. त्यांनी १ जुलै २०२४ पासून वेळोवेळी संस्थेकडे आणि शिक्षण विभागाकडे अर्ज करूनही त्यांच्या अर्जाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले.
संघटनेने आरोप केला आहे की, संस्थेचे अध्यक्ष प्रकाश किसन गायकवाड आणि सचिव प्रशांत प्रकाश गायकवाड यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्याशी संगनमत करून संघर्ष नागटिळक यांना शिक्षक पदाची नोकरी मिळू नये यासाठी कट रचला. नागटिळक यांच्या अर्जावर कारवाई करण्याऐवजी संस्थेने पोर्टलद्वारे शिक्षक भरतीचा प्रस्ताव दाखल केला. नागटिळक हे अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील असून, शिक्षक पदासाठी पात्र असतानाही त्यांना शिपाई पदावर काम करण्यासाठी दबाव आणण्यात आला. हा प्रकार म्हणजे अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा आहे, असे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.
पोर्टलद्वारे भरती केलेल्या दोन उमेदवारांपैकी एक उमेदवार हजर न झाल्याने सध्या संस्थेत शिक्षकाची एक जागा रिक्त आहे. असे असतानाही, संस्थेत पद रिक्त नसल्याची खोटी माहिती शिक्षणाधिकारी यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक आणि जिल्हाधिकारी यांना दिली असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.
संघर्ष नागटिळक यांनी यापूर्वी १५ सप्टेंबर २०२५ रोजी आत्मदहन आंदोलनाचा प्रयत्न केला होता, जो प्रशासनाच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आला होता. आता संघटनेने या प्रकरणात लक्ष घालून संघर्ष नागटिळक यांना छत्रपती शिवाजी प्रशाला, सुकटा येथे शिक्षक म्हणून तात्काळ नियुक्ती द्यावी, अशी मागणी केली आहे अन्यथा, संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करून फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि विभागीय शिक्षण उपसंचालक यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.
शिक्षणाधिकारी यांचे स्पष्टीकरण
“सदर बाबतीत संबंधित संस्थेस या कार्यालयाने लेखी पत्र देऊन उमेदवाराला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार अनुकंपा तत्वावर रुजू करून घेण्यासाठी कळविले आहे. त्यानुसार संस्था स्तरावर कार्यवाही सुरु आहे. तरी देखील सदरची संघटना खोटी तक्रार करत आहे व प्रशासनावर दबाव आणून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहे. संबंधितास अनुकंपा तत्वावर सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही नियमानुसार केली जाईल.”खाजगी संस्थेत कर्मचारी नियुक्ती करण्याचा व करवाही करण्याचा सर्व अधिकारी संस्थेचा आहे. शिक्षणाधिकारी यांना नियुक्ती करता येत नाही. तथापी नियमानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी यांनी संस्थेला दिल्या आहेत व संस्थेची इतर नियुक्ती नाकारली आहेत.– सुधा मारुती साळुंके, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प. धाराशिव.