भूम : वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना भूम तालुक्यात उघडकीस आली आहे. एका डॉक्टरनेच आपल्या शेतात पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढ्यावरच न थांबता, गर्भपात झालेल्या अर्भकाला शेतात का पुरले, याचा जाब विचारत आरोपी डॉक्टरने पीडित महिलेला मारहाणही केली. या संतापजनक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी पीडित महिला सविता संतोष बनसोडे (वय २५ वर्षे, रा. विजोरा, ता. वाशी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भूम पोलीस ठाण्यात डॉ. नंदकुमार रामलिंगप्पा स्वामी (वय ५७ वर्षे, रा. चिंचपुर ढगे, ता. भुम, ह.मु. दत्तनगर, बार्शी) याच्या विरोधात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉ. नंदकुमार स्वामी याने दि. १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळपासून ते १३ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंतच्या वेळेत, चिंचपुर ढगे येथील स्वतःच्या शेतात हा गुन्हा केला. त्याने पीडित महिला सविता बनसोडे यांना गाडीत झोपवून गाडीतील एका मशिनने तपासणी केली. पीडिता पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे माहीत असूनही, आरोपीने तिला एक गोळी खाण्यास दिली.
ती गोळी खाल्ल्यानंतर पीडितेच्या पोटात वेदना सुरू झाल्या आणि तिचा गर्भपात झाला. यानंतर पीडितेच्या पतीने ते अर्भक त्याच शेतात पुरले. मात्र, ‘अर्भक माझ्या शेतात का पुरले?’ असे म्हणत आरोपी डॉक्टर स्वामी याने पीडित महिलेलाच मारहाण करत अमानुषतेचा कळस गाठला.
घडलेल्या प्रकारानंतर पीडित महिलेने धाडस दाखवत १५ ऑक्टोबर रोजी भूम पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी डॉ. नंदकुमार स्वामी याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ८९, २३८ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेने वैद्यकीय पेशाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आरोपी डॉक्टरवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.