धाराशिव: “आम्ही पोलीस आहोत, तुमची चौकशी करायची आहे,” असे म्हणत दोन अज्ञात व्यक्तींनी एका ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला अडवून त्यांच्या हातातील ४० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शहरातील साठे चौकातील एस.टी. गॅरेजसमोर गुरुवारी, दि. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी प्रभुलिंग प्रतयाप्पा राजुरे (वय ६२, रा. गणेश नगर, झेंडा नं ०२, धाराशिव) यांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रभुलिंग राजुरे हे गुरुवारी सकाळी साठे चौकातील एस.टी. गॅरेजसमोरून जात होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना थांबवले. “आम्ही पोलीस आहोत, तुम्ही काय करता, कोठे राहता? तुमची चौकशी करायची आहे,” असे म्हणत त्यांनी राजुरे यांना बोलण्यात गुंतवले.
त्यातील एका आरोपीने राजुरे यांच्या खांद्यावर हात टाकून, “तुमच्या हातातील अंगठी काढून द्या, तिची चौकशी करायची आहे,” असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून राजुरे यांनी आपली ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून दिली. त्यानंतर आरोपीने हातचलाखी करत अंगठी खिशात ठेवल्याचे भासवले आणि तेथून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राजुरे यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
प्रभुलिंग राजुरे यांच्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २०४, ३१९ (२), ३ (५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांनी अशा तोतया पोलिसांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.







