धाराशिव: शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली तोकडी मदत आणि कर्जमाफीस होणाऱ्या विलंबाचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘काळी दिवाळी’ साजरी केली. जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काळे आकाश कंदील आणि काळे फुगे फोडून सरकारचे लक्ष वेधण्यात आले.
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मदतीचा आकडा जाहीर केला असला तरी, प्रत्यक्षात मिळणाऱ्या मदतीत मोठी तफावत असून ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनातील प्रमुख मागण्या:
- शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी.
- पीडित शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांचे अनुदान द्यावे.
- कोणत्याही अटी-शर्तींशिवाय संपूर्ण पीकविमा मंजूर करावा.
- सोयाबीनची तातडीने शासकीय खरेदी करून भावांतर योजना लागू करावी.
- अतिवृष्टीमुळे खरवडून गेलेल्या जमिनी आणि विहिरीतील गाळ काढण्याच्या क्लिष्ट अटी रद्द कराव्यात.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.






