भूम – भूम तालुक्यातील एका गावात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीच्या आईला घरातच कोंडून, पाच तरुणांपैकी एकाने मुलीला शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून भूम पोलीस ठाण्यात पाच तरुणांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही संतापजनक घटना १७ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित मुलगी (वय १४ वर्षे ८ महिने) आणि तिची आई घरी असताना, गावातीलच पाच तरुण गैरकायदेशीरपणे त्यांच्या घराबाहेर जमले.
आरोपी तरुणांनी प्रथम पीडितेच्या आईला शिवीगाळ केली आणि त्यानंतर घराला बाहेरून कडी लावून तिला आतमध्येच कोंडून ठेवले. यानंतर, त्या तरुणांपैकी एकाने अल्पवयीन मुलीस जबरदस्तीने जवळच्या शेतात नेले आणि तिच्यावर लैंगीक अत्याचार केला.
घडलेला प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही इतर तरुणांनी पीडिता आणि तिच्या आईला दिली. “झालेल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास तुला व तुझ्या आईला जिवे ठार मारीन,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या भयंकर प्रकारानंतर पीडितेच्या आईने १७ ऑक्टोबर रोजी भूम पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ६४(१), १२५, १८९(२), १९१(२), १९३(३), १९०, ३५२, ३५१(३) सह पोक्सो अधिनियम कलम ४, ८, १२ आणि अपंग व्यक्ती अधिनियम कलम ९२ (ड) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.







