शिराढोण: कळंब तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातीलच एका तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने पीडितेस जीवे ठार मारण्याची धमकीही दिली होती. याप्रकरणी पीडित मुलीने दि. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पोक्सो (POCSO) कायदा आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्याच्या विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (पीडितेचे नाव व गाव गोपनीय) १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी मागील आठ महिन्यांपासून याच गावात राहत आहे. दि. १८ ऑक्टोबर २०२५ रोजी गावातीलच एका तरुणाने पीडितेला तिच्या घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत आणि जवळच बांधकाम सुरू असलेल्या एका अर्धवट घरात नेले. तेथे आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही आरोपीने पीडितेस दिली होती. अखेर, पीडितेने धाडस दाखवून दि. २४ ऑक्टोबर रोजी शिराढोण पोलीस ठाणे गाठून घडलेला सर्व प्रकार कथन केला व रीतसर फिर्याद दिली.
पीडितेच्या प्रथम खबरेवरून, पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम- ६४(२)(एम), ६५(१), ७८,(१), ३५१ (३) तसेच पोक्सो कायदा कलम ४, ६, ८, १२ आणि अ.जा.ज.प्र.कायदा (ॲट्रॉसिटी) कलम ३(१)(आर), ३(१),(डी), ३(१)(डब्ल्यु), (i), ३(१)(डब्ल्यु)(ii), ३(२)(व्हि) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.







