धाराशिव : धाराशिव शहरातील बहुचर्चित आणि तब्बल दीड वर्षांपासून रखडलेल्या १४० कोटी रुपयांच्या रस्ते कामांचे कार्यारंभ आदेश (Work Orders) अखेर निघाले आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आणि लवकरच मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असल्याचे जाहीर केले. मात्र, यावरून महाविकास आघाडीने आ. पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. “निवडणुका डोळ्यासमोर ठेवून का असेना, पण सरकारला शहाणपण सुचले,” अशी बोचरी टीका करत, हा सर्व विलंब केवळ ‘आपल्या’ मर्जीतील गुत्तेदाराला काम देण्यासाठीच आ. राणा पाटील यांनी घडवून आणल्याचा घणाघाती आरोप महाविकास आघाडीने केला आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या शहरप्रमुखांनी संयुक्त प्रसिद्धीपत्रक काढून आ. पाटील यांच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. “स्वतःच रस्ते कामात अडवणूक करायची आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपल्या मर्जीप्रमाणे काम सुरू होत असल्याचा पोकळ दिखावा करायचा, ही राणा पाटील यांची जुनी खोड आहे,” असा थेट निशाणा मविआने साधला आहे.
स्वतःच्या गुत्तेदाराला काम देण्यासाठीच दिरंग केल्याचा गंभीर आरोप; २२ कोटी अतिरिक्त देऊन कुणाचे हात ओले करायचे होते? – मविआचा सवाल
महाविकास आघाडीने आ. पाटील यांना खडा सवाल विचारला की, “ही कामे निविदा रक्कमेपेक्षा २२ कोटी अधिक देऊन कोणाचे हात ओले करायचे होते? आपल्याच गुत्तेदाराला ही कामे देण्यासाठी दीड वर्ष शहरवासियांचे हाल केल्यावर, शेवटी त्यांच्याच पदरात हे काम पडल्यावर कार्यारंभ आदेश काढण्यात आले. यामुळे राणा पाटील यांचा खरा चेहरा सर्वांसमोर आला आहे,” असे मविआने म्हटले आहे.
ही कामे सुरू व्हावीत यासाठी महाविकास आघाडीने वेळोवेळी आंदोलने, आमरण उपोषण आणि रास्ता रोको केल्याचे सांगत, पालकमंत्र्यांकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच शहरवासियांच्या माथी बसणारा अतिरिक्त २२ कोटींचा बोजा वाचवण्यात आघाडीला यश आले असल्याचा दावाही करण्यात आला आहे. “निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही कामे सुरू करणे सरकारला क्रमप्राप्त होते, अन्यथा शहरात मते मागायला कोणत्या तोंडाने जायचे, हा विचार करूनच हे कार्यारंभ आदेश काढण्यात आले आहेत,” अशी टीकाही या पत्रकात करण्यात आली आहे. हे पत्रक काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष अय्याज शेख व शिवसेना ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी काढले आहे.
‘जनतेचे साठ कोटी वाचवले’ – आ. राणा पाटील यांचा दावा
तत्पूर्वी, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रतिष्ठान भवन येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, निविदेतील २०२३-२४ च्या अंदाजपत्रकीय दरानेच ही कामे होणार असल्याने, आजच्या दराच्या तुलनेत जनतेचे जवळपास साठ कोटी रुपये वाचणार आहेत. “तुळजापूर आणि नळदुर्गबरोबरच हे काम सुरू झाले असते तर, आत्तापर्यंत सत्तर टक्के काम पूर्णही झाले असते,” असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
या कामांसाठी १८ महिन्यांची मुदत असली तरी, ती वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे ते म्हणाले. त्यांनी या १४० कोटींच्या ‘ऐतिहासिक’ निधीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले. लवकरच या तिन्ही मान्यवरांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. मात्र, कामाला झालेल्या दीड वर्षांच्या विलंबामागील कारणांवर त्यांनी मौन बाळगणेच पसंत केले.







