धाराशिव – धाराशिव शहरातील १४० कोटींच्या रस्ते कामांना खुद्द शासनाने स्थगिती दिल्यानंतर सुरू झालेला राजकीय ‘गदारोळ’ आता नव्या वळणावर पोहोचला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे “राजकीय अप्रवृत्तींची काळजी करू नये,” असा सूचक इशारा दिल्यानंतर, शिवसेना (ठाकरे गट) चांगलीच आक्रमक झाली आहे.


“स्थगिती देणारे तुमचेच फडणवीस सरकार आणि दोष आमच्यावर? हा तर ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असा प्रकार आहे,” असा घणाघाती टोला ठाकरे सेनेचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी लगावला आहे.
आमदार राणा पाटील यांनी बुधवारी फेसबुकवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी “धाराशिवकरांनी राजकीय अप्रवृत्तींची काळजी करू नये. आपल्या अपेक्षांना न्याय मिळवून देणारच!” असे म्हटले होते. यानंतर, आमदार पाटील यांचे समर्थक ‘शुक्राचार्य’ प्रकटल्याच्या पोस्ट करत (पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर) टीका करत होते. मात्र, आता या वादात ठाकरे सेनेने उडी घेत थेट आमदार पाटलांनाच लक्ष्य केले आहे.
“दुकान तुमचं, दुकानदारी तुमची… अन् तोटा आमच्यामुळं?”
तानाजी जाधवर यांनी आमदार पाटलांच्या ‘अप्रवृत्ती’च्या टीकेचा समाचार घेतला. ते म्हणाले, “निधी जाहीर झाला की श्रेय यांनी घ्यायचं, पण मनासारखं नाही झालं की आमच्यावर ढकलायचं, हा रडका प्रकार आमदार पाटील करत आहेत. अहो, ‘दुकान तुमचं, दुकानदारी तुमची आणि तोटा झाला आमच्यामुळं’ हे कोणाला पटेल का?”
जाधवर यांनी महायुतीतील अंतर्गत वादावरच बोट ठेवले. “जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) कामांना स्थगिती आणली म्हणून ढोल वाजविणारे भाजप आमदार (राणा पाटील), आता त्यांच्याच मित्र पक्षाकडून (शिंदे गट) रस्ते कामास स्थगिती आल्यावर विरोधकांना दोष देत आहेत, हे हास्यास्पद आहे. तुमचेच मुख्यमंत्री सांगेल तेव्हा कोणत्याही कामाला स्थगिती देतात, मग रस्त्याच्या कामाला तुमच्याच सरकारने स्थगिती दिल्यावर विरोधकांवर बोट दाखवण्यापेक्षा मोठा विनोद कोणता?” असा सवाल जाधवर यांनी केला.
‘त्या’ कंत्राटदारावरून ‘प्रवृत्ती’वर टीका
आमदार पाटलांच्या ‘अप्रवृत्ती’ या शब्दावर पलटवार करताना जाधवर यांनी, “दुसऱ्यांना ‘अप्रवृत्ती’ म्हणणाऱ्यांची स्वतःची ‘प्रवृत्ती’ काय आहे? एक गुत्तेदार (कंत्राटदार) अपात्र असतानाही त्याला पुन्हा पात्र करून घेण्यासाठी वीस महिने तुम्ही केलेली धडपड तुमची प्रवृत्ती दाखवून देते. माझ्याच मनासारखं झालं तर ठीक, नाहीतर काहीच होऊ द्यायचे नाही, या तुमच्या मनोवृत्तीमुळे जिल्ह्याचे नुकसान होत आहे,” असा गंभीर आरोपही केला.
‘त्या’ कामांचे काय झाले?
जाधवर यांनी आमदार पाटलांना जुन्या स्थगितींची आठवण करून दिली. “जुलै २०२२ मध्ये महायुतीचे सरकार आल्यावर त्यांनीच (सत्ताधाऱ्यांनी) आघाडी सरकारने मंजूर केलेल्या शहरातील रस्ते, तीन बगीचा, आठवडी बाजार या सर्व कामांना स्थगिती दिली. न्यायालयीन निर्णय होऊनही स्थगिती उठवली नाही. मग सरकारमध्ये आमच्या मताला एवढं महत्त्व असते तर ही कामे रद्द झाली असती का?”
दरम्यान, रस्त्याच्या कामांची एसआयटी (SIT) चौकशीची मागणी कायम असल्याचे सांगत, “तुमच्या अर्थकारणामुळे शहरवासीयांचे हाल होत आहेत, ही रस्त्याची कामे लवकर सुरू व्हावीत,” अशी अपेक्षाही जाधवर यांनी व्यक्त केली.






