पात्रं:
- रस्ता (वय १८ महिने): धाराशिवचा ‘तो’ १४० कोटींचा, सध्या खड्डे आणि धुळीने माखलेला नायक.
- दादा (आमदार राणा पाटील): नायक (रस्ता) आपलाच असल्याचा दावा करणारे.
- पालक-भाऊ (पालकमंत्री सरनाईक): ‘गार्डियन’ ऑफ द गॅलेक्सी… (म्हणजे जिल्ह्याच्या).
- धाराशिवकर: (मूक प्रेक्षक, फक्त धूळ खाण्यासाठी).
अंक पहिला: ‘सत्कार’, ‘होर्डिंग’ आणि ‘६० कोटींची बचत’
“मी येतोय… मी येतोय…” धाराशिवचा १४० कोटींचा रस्ता स्वप्नात बडबडत होता.
त्याला ‘दादां’नी नुकतंच सांगितलं होतं, “बाळा, काळजी करू नको. तुझ्या कामाचा ‘कार्यारंभ’ आदेश आलाय. मी तुझ्यासाठी ६० कोटी वाचवलेत. आता लवकरच तिन्ही ‘मोठ्या’ साहेबांना आणून तुझं ‘भूमिपूजन’ करू. शहरात होर्डिंग लावलेत, सत्कार घेतलाय. तुझा ‘अजमेरा-मामा’च तुला चकचकीत करणार!”
रस्ता खुश झाला. पण त्याच्या बाजूला बसलेला ‘खड्डा’ कुत्सितपणे हसला.
“येड्या,” खड्डा म्हणाला, “तुला काय वाटलं, हे सगळं तुझ्यासाठी चाललंय? अरे, हा ‘विकास’ नाही, हा ‘बदला’ गड्या… ‘बदला’!”
अंक दुसरा: ‘DPC’ चा ‘लाडू’ आणि ‘हिशोब बरोबर’
रस्त्याने विचारलं, “कसला बदला?”
खड्डा म्हणाला, “आरं, एप्रिलमध्ये ‘दादां’नी ‘पालक-भाऊं’चा २६८ कोटींचा DPC चा ‘लाडू’ हिसकावून घेतला. का? तर त्या लाडूत ‘भाऊंचा’ वाटा ४० टक्के होता, आन ‘दादांचा’ फक्त १५ टक्के! ‘दादां’नी वर (दिल्ली/मुंबई) फोन लावून त्या पूर्ण ताटावरच ‘स्थगिती’ आणली.”
“मग?” रस्त्याने उत्सुकतेने विचारले.
“मंग काय! ‘पालक-भाऊ’ चिडले. त्यांनी ठरवलं, ‘हिशोब बरोबर’ करायचा. त्यांनी बघितलं, ‘दादां’चं सगळ्यात लाडकं पोर कोण? तर ‘तू’ (१४० कोटींचा रस्ता)!”
“मी?”
“व्हय! ‘दादां’ना तुझ्याकडून (आणि तुझ्या ‘अजमेरा-मामा’कडून) लय अपेक्षा होत्या. ‘भाऊं’नीबी वर (शिंदे साहेब) फोन लावला… आन तुझ्याच ‘भूमिपूजना’वर ‘स्थगिती’ आणली. झालं? ‘हिशोब बरोबर’!”
अंक तिसरा: ‘परस्पर’ कार्यक्रम आणि ‘शुक्राचार्याची’ एन्ट्री
‘दादा’ गप्प बसणारे नव्हते. निवडणुका जवळ आल्या. त्यांनी DPC च्या २६८ कोटींपैकी २२ कोटींची स्थगिती उठवल्याचा ‘देखावा’ केला. पण त्यांचा खरा डोळा तुझ्यावर (रस्त्यावर) होता. त्यांनी ‘पालक-भाऊं’ना न सांगताच, ‘परस्पर’ तुझा ‘कार्यारंभ’ आदेश काढायचा प्रयत्न केला.
‘पालक-भाऊ’ परत संतापले. “मला न विचारता करतोस काय!”
त्यांनी थेट नगरविकास विभागातून ‘गजानन’ नावाच्या अधिकाऱ्याचा ‘बाण’ (पत्र) सोडला. पत्रावर शिक्का होता: “तूर्त स्थगिती. तक्रारीची चौकशी करा.”
‘दादां’चे कार्यकर्ते खवळले. त्यांनी फेसबुकवर टाकलं: “तीन पैकी एक शुक्राचार्य प्रकटला!” (उघड उघड ‘पालक-भाऊं’ना टोमणा).
अंक चौथा: ‘अप्रवृत्ती’ विरुद्ध ‘चोराच्या उलट्या बोंबा’
‘दादां’नी लगेच फेसबुक पोस्ट टाकली: “धाराशिवकरांनी ‘राजकीय अप्रवृत्तीं’ची काळजी करू नये. मी न्याय मिळवणारच!”
हे बघून शेजारच्या गल्लीतले ‘ताना-भाऊ’ (ठाकरे गट) मैदानात आले.
“आवरा!” ताना-भाऊ ओरडले, “स्थगिती देणारं तुमचंच फडणवीस सरकार. ‘पालक-भाऊ’ तुमचाच मित्र. भांडताय तुम्ही… आन बोटं आमच्याकडं? ‘चोराच्या उलट्या बोंबा’!’
ते पुढे म्हणाले, “अहो, ‘दुकान तुमचं, दुकानदारी तुमची, आन तोटा आमच्यामुळं?’… तुमची ‘प्रवृत्ती’ काय? एका ‘अपात्र’ कंत्राटदारासाठी २० महिने धडपड केली… तीच तुमची ‘अप्रवृत्ती’!”
अंक पाचवा: #हीच_तुझी_लायकी (ग्रँड फिनाले)
आता युद्ध रस्त्यावरून होर्डिंगवर आलं.
एका बाजूने होर्डिंग लागलं: “पक्षप्रवेशाची ‘भीक’ मागून विकास थांबवणारा… #हीच_तुझी_लायकी”
(हा ‘दादां’च्या बाजूने ‘ताना-भाऊं’ना टोमणा).
दुसऱ्याच क्षणी सोशल मीडियावर पोस्टर आलं: “लाडक्या कंत्राटदाराला ‘टक्केवारी’साठी २० महिने धडपडून काम दिलं. म्हणून तुझ्याच ‘फडणवीस’ सरकारने स्थगिती दिली… #हीच_तुझी_लायकी”
(हा ‘ताना-भाऊं’कडून ‘दादां’वर थेट हल्ला).
पडदा पडतो:
बिचारा १४० कोटींचा रस्ता, ज्याचं भूमिपूजन होणार होतं, तो खड्ड्यात पडून हे सगळं बघत होता. ‘दादा’ आणि ‘पालक-भाऊ’ ‘हिशोब बरोबर’ करण्यात मग्न होते. ‘ताना-भाऊ’ ‘प्रवृत्ती’ आणि ‘टक्केवारी’वर बोलत होते. आणि धाराशिवकर? ते मात्र तोंडाला रुमाल बांधून, या सगळ्या ‘राजकीय धुळी’तून वाट काढत होते.
खड्डा पुन्हा हसला. “का रे रस्त्या… कधी हाय ‘भूमिपूजन’? की झाला ‘गेम ओव्हर’?”






