धाराशिव – धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेला आज रोजी, एक मोठे यश मिळाले आहे. राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्रीच्या वेळी ‘जॅक’ टाकून प्रवाशांच्या गाड्या बंद पाडून दरोडा टाकणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. याप्रकरणी अर्जुन बालाजी शिंदे आणि अशोक हिरामन शिंदे या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर अशा घटना वारंवार घडत होत्या , ज्यामुळे सामान्य जनतेच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. दि. १६/१०/२०२५ रोजी मध्यरात्री उमरग्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका डॉक्टरच्या कुटुंबीयांना अशाच प्रकारे लुटण्यात आले होते. या घटनेप्रकरणी डॉ. अब्दूल गफूर अब्दूल रउफ जनैदी यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे मुरुम येथे दरोड्याचा गुन्हा (गु.र.नं. ३०९/२०२५) दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी विनोद ईज्जपवार यांना तातडीने तपास करण्याचे निर्देश दिले होते. श्री. ईज्जपवार आणि त्यांच्या पथकाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. त्यांनी तांत्रिक माहितीचे विश्लेषण आणि पारंपारिक पद्धतीचा वापर करून आरोपी व गुन्ह्यात वापरलेले वाहन निष्पन्न केले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींनी चौकशी केली असता, त्यांनी मुरुम हद्दीतील दरोडा इतर चार साथीदारांच्या मदतीने केल्याचे कबूल केले. तसेच, जळगाव जिल्ह्यातही अशाच प्रकारे जॅक टाकून गाडी अडवून दरोडा टाकल्याची माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी मुरुम येथील गुन्ह्यात वापरलेली XUV500 गाडी आणि जॅक जप्त केला आहे. त्यासोबतच, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पोलीस ठाणे हद्दीत केलेल्या दरोड्यातील ट्रक देखील जप्त करण्यात आला आहे.
सदरील कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार, स.पो.नि. सुदर्शन कासार, आणि पोलीस अंमलदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, महिला पोलीस अंमलदार शोभा बांगर, फरहान पठाण, राठोड, सुभाष चौरे, प्रकाश बोईनवाड, रत्नदीप डोंगरे, व नागनाथ गुरव यांनी पार पाडली. या कारवाईत QRT आणि RCP पथकाने देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.






