तुळजापूर – “आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांनाच लुटण्याचं काम सुरू झालंय का?” असा संतप्त सवाल आता तुळजापुरात विचारला जाऊ लागला आहे. निमित्त आहे मंदिर परिसरातील ‘नो पार्किंग’च्या दंडाचा. एकीकडे सामान्य भक्तांकडून ५०० रुपये अक्षरशः वसूल केले जात आहेत, तर दुसरीकडे आमदाराच्या पीएचा एक फोन आला की गाडी ‘फुकटात’ सुटते, असा धक्कादायक ‘VVIP’ प्रकार समोर आला आहे. या उघड दुजाभावामुळे सामान्य भक्त मात्र रडकुंडीला आले आहेत.
नेमकं घडलं काय?
कर्नाटकातून आलेल्या एका भक्ताची गाडी ‘नो पार्किंग’मध्ये लागली. चूक झाली, पण त्यानंतर जो ‘तमाशा’ झाला तो याहून भयंकर होता. तेथील तहसीलदार आणि मंदिराच्या सिक्युरिटी गार्डने मिळून या भक्ताला ५०० रुपयांचा दंड ठोठावला.
‘खाकी’ ड्रेसमध्ये ‘आरटीओ’ची वसुली!
मुळात, आरटीओच्या (RTO) नियमाप्रमाणे, ‘नो पार्किंग’चा दंड हा जागेवर अधिकृत पावती देऊनच घ्यावा लागतो. पण इथे तसं काहीच झालं नाही. सगळ्यात धक्कादायक म्हणजे, जो कर्मचारी हा दंड वसूल करत होता, त्याने आरटीओचा अधिकृत ड्रेस न घालता, चक्क ‘खाकी’ ड्रेसवर ही वसुली केली. हा अधिकार या कर्मचाऱ्याला दिला कुणी?
कंत्राटी गार्डना ‘गाडी उचलण्याची’ सुपारी?
हा सगळा प्रकार इथेच थांबत नाही. मंदिरातील कंत्राटी सिक्युरिटी गार्डना तर जणू ‘गाडी उचलण्याची’ सुपारीच दिली आहे. हे गार्ड भक्तांच्या गाड्या उचलून थेट पोलीस स्टेशनमध्ये जमा करत आहेत. एकतर कंत्राटी सिक्युरिटी गार्डला गाडी उचलायचा अधिकार आहे का? आणि पोलीस स्टेशनमध्ये नेऊन दंड फाडण्याची ही पद्धत कोणत्या कायद्यात बसते? या संपूर्ण प्रकारामुळे भक्त अक्षरशः रडत आहेत.
VVIP साठी एक न्याय, सामान्यांसाठी दुसरा!
या ‘वसुली’ला दुसरी, तितकीच काळी बाजू आहे. सामान्य भक्ताला ५०० रुपयांसाठी रडवणाऱ्या याच सिस्टीममध्ये, एका आमदाराचे पीए सुजित जमदाडे यांचा एक फोन पोलीस स्टेशनमध्ये खणखणतो… आणि एकाही रुपयाचा दंड न घेता गाडी सोडून दिली जाते!
सामान्य भक्तांकडून मात्र ५०० रुपये वसूल केल्याशिवाय गाडी सोडली जात नाही. आईच्या दारात येणाऱ्या भक्तांवर हा सरळसरळ अन्याय आहे. देवाच्या नावाने सुरू असलेला हा ‘पार्किंग’चा गोरखधंदा नेमका कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? याचा जाब आता प्रशासनाला द्यावाच लागेल.






