धाराशिव: धाराशिवच्या राष्ट्रवादीत (शरद पवार गट) सध्या ‘भाकरी’ कमी आणि ‘गोंधळ’ जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाध्यक्षपदावरून सुरू झालेला ‘चप्पल’ एपिसोड आता ‘तारीख-पे-तारीख’च्या खेळात अडकला आहे. संजय पाटील दुधगावकर यांनी राजीनामा दिला की, पक्षाने त्यांना ‘नारळ’ दिला, यावरच आता पैजा लागत आहेत.
या प्रकरणातील ‘टायमिंग’ इतकं ‘जबरदस्त’ आहे की, एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमालाही मागे टाकेल.
‘तारीख’ पुराण: आधी ४ की आधी ५?
घडलेला प्रकार समजून घेण्यासाठी तुम्हाला ‘कॅलेंडर’ची मदत घ्यावी लागेल:
- दिनांक ४ नोव्हेंबर: शरद पवार यांच्या आदेशावरून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे ‘शिक्षण सम्राट’ डॉ. प्रतापसिंह पाटील यांचे नियुक्ती पत्र तयार करतात, कारण पत्रावर तारीख ४ नोव्हेंबर आहे. ( सीन १ समाप्त)
- दिनांक ५ नोव्हेंबर: (म्हणजे नियुक्तीच्या ‘दुसऱ्या’ दिवशी) ‘अनवाणी’ सत्याग्रह करणारे संजय पाटील दुधगावकर हे आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा ‘राजीनामा’ जाहीर करतात. (सीन २ समाप्त)
- दिनांक ५ नोव्हेंबर: दुधगावकर यांचा राजीनामा मिळताच मुंबईत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे ‘शिक्षण सम्राट’ डॉ. प्रतापसिंह पाटील यांना धाराशिव जिल्हाध्यक्षपदाचे ‘नियुक्तीपत्र’ प्रदान करतात. (सीन ३ समाप्त)
आता या ‘आधी नियुक्ती, मग राजीनामा’ प्रकारामुळे, ‘आधी काय झालं, कोंबडी की अंडं?’ या प्रश्नाइतकाच ‘आधी हकालपट्टी की राजीनामा?’ हा प्रश्न महत्त्वाचा ठरला आहे.




‘पवार’ पॉईंट: चार दिवसांपूर्वीच ‘स्क्रिप्ट’ फायनल!
हा सगळा ‘गोंधळ’ नसून, ‘पडद्यामागील’ पक्की ‘स्क्रिप्ट’ असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
झालं असं की, चार दिवसांपूर्वी धाराशिवमधील नाराज कार्यकर्त्यांच्या एका शिष्टमंडळाने थेट ‘सिंहासना’लाच (म्हणजेच शरद पवार साहेबांना) गाठले. दुधगावकर यांच्या ‘एकला चलो रे’ कार्यपद्धतीवर आणि ‘चप्पल-त्याग’ आंदोलनावर (जे पक्षापेक्षा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जास्त असल्याची तक्रार होती) जोरदार ‘फिर्याद’ मांडण्यात आली.
“साहेब, काहीही करा, पण जिल्हाध्यक्ष बदला!” अशी ‘आर्त’ मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली.
कार्यकर्त्यांचा हा ‘आक्रोश’ आणि पक्षाची ‘करपत’ चाललेली भाकरी पाहून, साहेबांनी ‘भाकरी फिरवण्याचा’ (म्हणजेच बदलण्याचा) निर्णय घेतला. हा निर्णय इतक्या ‘तात्काळ’ घेण्यात आला की, इकडे ५ तारखेला दुधगावकर ‘राजीनामा’ देण्याच्या पवित्र्यात असताना, तिकडे ४ तारखेलाच ‘नवीन जिल्हाध्यक्षांच्या’ नावाची पाटी झळकत होती.
थोडक्यात काय, तर संजय पाटील दुधगावकर यांनी ‘नाराजीने’ राजीनामा दिला नसून, ‘चार दिवसांपूर्वीच’ त्यांच्या ‘बदली’वर शिक्कामोर्तब झाले होते. यालाच ‘राजकीय टायमिंग हुकणे’ असे म्हणतात! आता हा ‘चप्पल-त्यागी’ नेता पुढे काय भूमिका घेणार, याकडेच सगळ्यांचे लक्ष लागले आहे.





