धाराशिव | धाराशिव नगर पालिकेची निवडणूक जाहीर झाली असून, २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे जिल्हा प्रवक्ते ॲड. विशाल साखरे यांच्या एका फेसबुक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी ‘लबाड लांडगा’ असा सांकेतिक उल्लेख करत एका उमेदवारावर जोरदार निशाणा साधला आहे.
विशेष म्हणजे, हा टोला त्यांनी महायुतीमधीलच एका पक्षाच्या, त्यांच्याच प्रभागातील एका ‘स्वयंघोषित’ नेत्याला लगावला असल्याची चर्चा आहे.
काय आहे ॲड. साखरे यांची पोस्ट?
ॲड. विशाल साखरे यांनी ‘एक मतदार’ या नावाने ही पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे:
“समता नगर मधील सुजान मतदार यांना विनंती. गोड बोलून पोटात शिरून परत मूग गिळायला लावणाऱ्या लबाड लांडगा उमेदवार याच्या पासून सावधान. दाखवायचं समाजकारण आणि करायचं स्वतःच व्यवसाईकरण…. बोला धूर्त लबाड 🦊 लांडगा ढोंग करतय…… बोल बच्चन. एक मतदार. 🙏 जय महाकाल 🔱”
राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
साखरे यांनी या पोस्टमध्ये थेट कोणाचेही नाव घेतलेले नाही. मात्र, राजकीय वर्तुळातील माहितीनुसार, हा ‘लबाड लांडगा’ असा सांकेतिक उल्लेख महायुतीमधीलच एका पक्षाच्या ‘स्वयंघोषित’ नेत्यासाठी आहे. हा नेता ॲड. साखरे यांच्याच समता नगर प्रभागातील असून, या नेत्याची पत्नीदेखील नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहे.
पत्नी नगराध्यक्षपदाची प्रबळ दावेदार
एकीकडे ॲड. विशाल साखरे यांनी फेसबुकवरून महायुतीमधीलच नेत्यावर टीकास्त्र सोडले असतानाच, दुसरीकडे त्यांच्या पत्नी ॲड. सौ. मंजुषा विशाल साखरे यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून समोर आले आहे.
यंदाचे नगराध्यक्षपद हे ‘ओबीसी महिला’साठी राखीव आहे. ॲड. मंजुषा साखरे यांचा शहरातील महिला मंडळात आणि समता प्रभागात चांगला जनसंपर्क आहे. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून, त्या स्वतः वकील असल्यामुळे त्यांना नगरपालिकेच्या कार्याची चांगली माहिती आहे, अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर त्यांच्या समर्थकांकडून व्हायरल होत आहेत.
महायुतीतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर?
नगराध्यक्षपद (ओबीसी महिला) एकाच पदासाठी ॲड. मंजुषा साखरे आणि त्याच प्रभागातील महायुतीच्या घटकपक्षातील नेत्याची पत्नी, अशा दोघीही इच्छुक आहेत. याच दरम्यान ॲड. विशाल साखरे यांनी ‘लबाड लांडगा’ म्हणून केलेल्या पोस्टमुळे हा वाद आता विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत. एकाच पदासाठी मित्रपक्षांमध्ये होणारी स्पर्धा आणि त्यातून होणारी थेट टीका, यामुळे महायुतीमधील अंतर्गत गटबाजी निवडणुकीच्या तोंडावरच चव्हाट्यावर आल्याची चर्चा धाराशिवच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.





